नगर : बदल्यांवर 71 गुरुजींच्या हरकती; पुरावे सादर न केल्याने 36 हरकती फेटाळल्या | पुढारी

नगर : बदल्यांवर 71 गुरुजींच्या हरकती; पुरावे सादर न केल्याने 36 हरकती फेटाळल्या

नगर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये बदलीपात्र, बदली अधिकार प्राप्त, संवर्ग 1 आणि संवर्ग 2 अशा यादीवर आक्षेप किंवा प्रोफाईलमध्ये दुरुस्तीच्या कारणांतून 71 गुरुजींनी शिक्षणाधिकार्‍यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी यावर सुनावणी घेवून आपल्या हरकतीबाबत पुरावे सादर करणार्‍या सुमारे 35 गुरुजींचे म्हणणे मान्य करून त्यात आवश्यक दुरुस्तीची तयारी दर्शवली. तर उवर्रीत 36 गुरुजींनी पुरावे सादर न केल्याने त्यांच्या हरकती फेटाळण्यात आल्याचेही समजले. आता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे अपिल करण्याची संबंधितांना संधी आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांची लगीनघाई सुरू आहे. शासनाच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत संवर्ग 1, संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त आणि बदलीस पात्र अशाप्रकारे शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दरम्यान या याद्यांवर हरकती असल्यास पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने त्या नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होेते. त्यानुसार नगर जिल्ह्यातून सुमारे 71 शिक्षकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या हरकती नोंदवल्या होत्या.

त्यावर शिक्षणाधिकारी पाटील यांनी सुनावणी घेतली. यात आपल्या हरकतींसोबत पुरावे सादर करणार्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. मात्र ज्यांनी पुरावे सादर केले नाही, त्यांच्या हरकती यावेळी फेटाळण्यात आल्याचेही समजले. दरम्यान, ज्यांच्या हरकती फेटाळण्यात आल्या, त्यांना सीईओंकडे हरकती दाखल करण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत संधी आहे. यावर सीईओ येरेकर हे सुनावणी घेणार आहेत. दि. 20 डिसेंबरपासून संवर्ग 1 साठी पसंतीक्रम भरण्याची सुविधा सुरू होईल.

Back to top button