नगर : सहा लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास ; दिवसेंदिवस गर्दी | पुढारी

नगर : सहा लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास ; दिवसेंदिवस गर्दी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सव्वादोन महिन्यांत जिल्ह्यातील 5 लाख 69 हजार 834 अमृत ज्येष्ठ नागरिकांनी एसटी महामंडळाच्या बसद्वारे मोफत प्रवास केला आहे. मोफत प्रवास असल्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिकांना आता पंढरपूर, शेगाव, कोल्हापूर, गणपतीपुळे, अष्टविनायक आदी ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. यावर्षीच्या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षेॅ पूर्ण झाले. त्यामुळे देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. शिंदे- फडणवीस सरकारने 75 वर्षे वयोमान पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसद्वारे राज्यभरात मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला आता अमृत ज्येष्ठ नागरिक योजना म्हणून ओळखले जात आहे.

यापूर्वी 65 वर्षे वयोमान पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत आहे. मात्र, या ज्येष्ठ नागरिकांना फक्त साध्या बसमधूनच प्रवास करणे बंधनकारक होते. शिंदे-फडणवीस सरकारने या ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही, स्लिपरकोच, एशियाड तसेच शिवनेरी आदी बसमधून 50 टक्के भाडेदरात प्रवास करण्यास मुभा दिली आहे.

राज्यभरात अमृत ज्येष्ठ नागरिक योजना 26 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली आहे.या योजनेमुळे 75 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व्यक्तींना आता मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देवदर्शन व पाहुणे रावळे यांच्या भेटीची ओढ ज्येष्ठ नागरिकांना असते. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे 75 वयांपेक्षा अधिक ज्येष्ठांना आता राज्यभरातील देवदर्शन मोफत होत आहे. 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील 20 हजार 551 ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला आहे.

सप्टेंबर महिन्यात 2 लाख 47 हजार 181 अमृत ज्येष्ठ नागरिकांनी बसव्दारे मोफत प्रवास केला आहे. ऑक्टोबर महिन्यात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी बसला वाढली. या महिन्यात जिल्हाभरातील तब्बल 3 लाख 2 हजार 102 अमृत ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. एकंदरीत गेल्या सव्वादोन महिन्यांत 5 लाख 69 हजार 834 अमृत ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बसव्दारे प्रवास केला आहे.

सव्वादोन महिन्यांत तीन कोटींचा प्रवास

मोफत प्रवासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे 5 लाख 69 हजार 834 अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाचे बील राज्य सरकार एसटी महामंडळाला अदा करणार आहेत. 2 कोटी 96 लाख 23 हजार 535 रुपये एवढी रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळणे अपेक्षित आहे.

शासनाने मोफत प्रवासाचा निर्णय घेतल्यामुळे

एसटी महामंडळाच्या बसला 75 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली. शक्यतो पंढरपूर, शेगाव, कोल्हापूर, अष्टविनायक, आदी ठिकाणी देवदर्शनाला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे.
– वाहक, एसटी महामंडळ

Back to top button