पाथर्डी : ‘एटीएम’मधून पैसे काढून फसवणूक ; पत्नीचा मोबाईलही केला लंपास | पुढारी

पाथर्डी : ‘एटीएम’मधून पैसे काढून फसवणूक ; पत्नीचा मोबाईलही केला लंपास

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पतीने पत्नीच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे 80 हजार रुपये रोख व एक मोबाईल फोन नेत फसवणूक केल्याची घटना पाथर्डीमध्ये घडली. याबाबत रेश्मा पंडित उर्फ संदीप सानप (रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून पती पंडीत उर्फ संदीप सखाराम सानप (रा.हिवरशिंगा, ता. शिरुर कासार, जि.बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी रेश्मा सानप ही पुणे येथून पाथर्डी येथे येऊन पती पंडीत उर्फ संदीप सानप यास शनिवारी सायंकाळी भेटली. तेव्हा पत्नी रेश्मा हिने पती पंडित यास ठरल्याप्रमाणे सोबत पुण्यास येण्यास सांगितले.

त्यावर पतीने माझी तब्येत ठिक नाही, आपण येथेे लॉजवर जाऊन आराम करू व सकाळी पुण्याला जाऊ असे सांगितले. दोघे पाथर्डी शहरातील एक लॉजवर गेले. आराम करत असताना पत्नी रेश्माला झोप लागली. एक दीड तासाने जाग आल्यानंतर तिला पती तेथे दिसला नाही. तिचा मोबाईल व एटीएम कार्ड तो घेऊन गेला. त्यानंतर पत्नी रेश्मा हिने लॉजच्या काउंटरवर येऊन चौकशी केली असता, तिचा पती त्याचे आधारकार्ड घेऊन एक तासापूर्वी निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर रेश्मा हिने जवळ पैसे नसल्याने आधारकार्डावरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, आकऊंटवर पैसे नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिने पतीविरोधात तक्रार केली.

Back to top button