

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : डॉक्टर हा सामाजिक संवेदनशिलता असलेला वर्ग आहे. कोविड काळात आपण अनेक आव्हानांना तोंड दिले, अनेक अडचणींना सामोरे गेलो. अशा परिस्थितीत भारतीय डॉक्टर्सनी 24 तास राबून सेवा दिली. त्यांच्या योगदानामुळे खूप चांगले काम होऊन कोविड महामारीवर विजय मिळविणे शक्य झाले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांनी रविवारी (दि.11) काढले. 'पुढारी' माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल अजंता अॅम्बेसिडर येथे आयोजित 'पुढारी हेल्थ आयकॉन' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे, युनिट हेड कल्याण पांडे, नगर आवृत्तीचे वृत्त संपादक संदीप रोडे, व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, मुख्य प्रायोजक डॉ. अमोल चाटे यांची उपस्थिती होती. या समारंभात अहमदनगर येथील नामवंत डॉक्टरांचा 'पुढारी हेल्थ आयकॉन' अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, डॉक्टरची पदवी मिळवल्यानंतर रुग्ण आपल्याकडे येतात, असे नाही. सेवा देताना रुग्णांमध्ये आपण जो विश्वास निर्माण करतो त्यामुळे लोक आपल्याकडे येतात. अनेकदा आपल्या चांगल्या बोलण्यामुळे अनेकजण बरे होतात.कोविडचा काळ आपण सर्वांनी अनुभवला. खूप कठीण काळ होता. मीही त्यातून गेलो. कोविड झाल्याचे जेव्हा मला कळाले तेव्हा फॅमिली डॉक्टर्सकडे उपचार घेण्यासाठी नांदेडहून मुंबईला जाण्यास निघालो. त्यावेळी लोक मला सोडायला आले होते, जणू काही मी परत येणारच नाही, असे अनुभवल्याची आठवणही चव्हाण यांनी काढली.
कोरोना काळात भीतीदायक परिस्थिती होती. सुरुवातीला रेमडेसीवीर इंजेक्शन भारतात नव्हते. कशापद्धतीने उपचार करायचे, असे अनेक प्रश्न होते. मृत्युमुखी पडलेल्यांचा अंत्यविधीही करता आला नाही. अशा परिस्थितीत कोविडचे आव्हान आपण सर्वांनी पार पाडले. हे करत असताना कोणत्या सुविधांची गरज आहे, काय कमतरता आहे, अशा अनेक उणिवा आपल्याला जाणवल्या. आगामी काळात अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला प्राधान्याने जास्तीत जास्त निधी देऊन सक्षम बनविले पाहिजे. यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. खासगी सेक्टरमधील वैद्यकीय सेवा देणारे आणि शासन या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांतून उत्तम वैद्यकीय सेवा कशा देता येतील त्यादृष्टीने पावले उचलली गेली पाहिजे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. अक्षय शिरसाठ, डॉ. ज्ञानेश्वर राहिंज, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. करणसिंग घुले, डॉ. सचिन कोरडे, डॉ. प्रकाश पवार, डॉ.स्वप्निल माने, डॉ. रमेश गोसावी, डॉ.संतोष झाडे, डॉ.मनोजकुमार कापसे, डॉ. सुधीर सुद्रिक, डॉ. सतीश वर्पे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबाद, अहमदनगर येथील नामवंत डॉक्टरांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली याबद्दल 'पुढारी' चे आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी 'पुढारी'ची वाटचाल अतिशय जवळून पाहिलेली आहे. 1980 पासून मी 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या संपर्कात असून, त्यांचे काम जवळून पाहिलेले आहे. 'पुढारी' म्हणजे लीडरशीप आहे. सामाजिक व अन्य क्षेत्रांतही 'पुढारी'ने मोठे योगदान दिल्याचे गौरवोद्गारही चव्हाण यांनी काढले.
सियाचीन येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्य देशाचे संरक्षण करते, अशा ठिकाणी वैद्यकीय सेवांची नितांत गरज असल्याची बाब हेरून पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे तिथे हॉस्पिटल कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
जी-20 देशांचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी आपल्याला मिळाली ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जगातील शक्तिशाली देशांचे नेतृत्व करण्याची संधी यामुळे मिळाली आहे. या संधीतून काही चांगले साध्य करता आले पाहिजे. आरोग्यसेवेचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागात उत्तम सेवा कशी देता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.