श्रीगोंदा : ‘नागवडे’ सहकारी साखर कारखाना एक नंबर ऊस दर देणार : अध्यक्ष राजेंद्र नागवडे | पुढारी

श्रीगोंदा : ‘नागवडे’ सहकारी साखर कारखाना एक नंबर ऊस दर देणार : अध्यक्ष राजेंद्र नागवडे

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : चालू गळीत हंगामात सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर तालुक्यात एक नंबर, तर जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या बरोबरीने राहणार आहे. कारखान्याने 30 नोव्हेंबरअखेर गाळप केलेल्या एक लाख 77 हजार 760.205 मेट्रिक टन उसाचे पहिले पेमेंट 2300 रूपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे 40.88 कोटी रुपये सभासद शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. नागवडे कारखान्याचा गाळप हंगाम 27 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे. 30 नोव्हेंबर अखेर कारखान्याने 1 लाख 77 हजार 760.205 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सदर उसाचे पहिले पेमेंट 12 डिसेंबर रोजी 2300 प्रती मेट्रिक टनाप्रमाणे संबंधित सभासद शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे.

कारखान्याने 10 डिसेंबरअखेर 2 लाख 37 हजार 340 मे.टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून रॉ शुगर 1 लाख 88 हजार 550 क्विंटल, तर पांढरी साखर 19 हजार 100 क्विंटल, अशी एकूण दोन लाख सात हजार सहाशे पन्नास क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 8.77 एवढा मिळालेला आहे. कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प चालू असून, आजअखेर एक कोटी बारा लाख 84 हजार 488 युनिट वीज वितरण कंपनीला वितरित करण्यात आली आहे.

चालू गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने कारखाना संचालक मंडळ व प्रशासन प्रयत्नशील आहे. नागवडे कारखान्याने सातत्याने चांगला ऊस भाव दिलेला असून, कारखाना ऊस भावाबाबत कधीही मागे राहिलेला नाही. शिवाय सर्व पेमेंट हे वेळचे वेळी दिलेले आहेत. चालू गळीत हंगामात नागवडे कारखान्याचा अंतिम ऊस भाव हा तालुक्यात एक नंबरचा व जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने राहणार आहे. सभासद शेतकर्‍यांनी ऊस गाळपासाठी फार घाई न करता, नागवडे कारखान्यास ऊस देऊन जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

 

Back to top button