वाळकी : मंदिरातील पुजार्‍यांनीच चोरले देवीचे दागिने | पुढारी

वाळकी : मंदिरातील पुजार्‍यांनीच चोरले देवीचे दागिने

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी मातेच्या मंदिरात तीन महिन्यांपूर्वी, 10 ऑगस्टच्या पहाटे झालेल्या चोरीचा ‘एमआयडीसी’ पोलिसांनी अखेर छडा लावला. मंदिरात चोरी करणारा दुसरे- तिसरे कोणी नसून मंदिराचे आजी-माजी पुजारीच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. मंदिरातील सध्याचा पुजारी किसन नरहरी बोराडे व पूर्वीचा पुजारी बाळासाहेब भानुदास चौधरी (दोघे रा. पिंपळगाव उज्जैनी, ता.नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मंदिरातून चोरलेला एक लाख आठ हजारांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

‘एमआयडीसी पोलिस ठाण्यात जगन्नाथ विश्वनाथ मगर यांनी फिर्याद दिली होती की, पिंपळगाव उज्जैनीचे ग्रामदैवत उज्जैनी माता मंदिरात देवीच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून चोरी झाली. या घटनेत देवीचे दागिने व दान पेटीतील रोख रक्कम चोरीला गेली असल्याची फिर्याद दिलेली होती. या गुन्ह्याचा तपास ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सी.बी. हंडाळ करत असताना ही चोरी पुजार्‍याने केल्याचे समोर आले. किसन बोराडेला ताब्यात घेवून चौकशी केली. देवीच्या मंदिराजवळील त्याच्या खोलीची झडती घेतली असता खोलीत दानपेटीतील रोख रक्कम मिळून आली.

आरोपीकडे देवीच्या चोरीस गेलेल्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता, ही चोरी त्याने व पूर्वी देवीचा पुजारी म्हणून राहत असलेला पुजारी बाळासाहेब भानुदास चौधरी, अशा दोघांनी मिळून केली असल्याचे सांगितले व दागिने त्याने नेलेले असल्याचे सांगितले. त्यानंतर बाळासाहेब भानुदास चौधरीला अटक करून त्याच्याकडून दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचा देवीचा कपाळावरील मुकुट, असा एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Back to top button