कुकाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत | पुढारी

कुकाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत

नेवासा/कुकाणा:पुढारी वृत्तसेवा : थकबाकीपोटी सव्वापाच लाख रुपयांची रक्कम भरल्यानंतर बंद झालेला कुकाणा गावचा नळपाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत पूर्ववत सुरु झाला. सरपंच लताताई अभंग यांनी ही माहिती दिली. नळपाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढत चालल्याने कुकाणा गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. ही बातमी ‘पुढारी’ने प्रसिध्द करताच ध्वनिक्षेपक यंत्रणा ,सोशल मिडीया व प्रसिद्धीमाध्यमांतून ग्रामपंचायतीने नागरीकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला नागरीकांनीही प्रतिसाद दिला. सरपंच लता अभंग, अमोल अभंग, मनोज हुलजुते, भाऊसाहेब फोलाणे यांनी स्वत:हून पाणीपट्टी भरणार्‍यांचा सत्कार केला. त्यानंतर अनेकांनी पाणीपट्टी भरली. चारच दिवसात पाच लाखाहुन अधिक थकबाकी जमा करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली. जमा झालेली ही रक्कम नळपाणीपुरवठा योजनेकडे भरण्यात आल्याने शुक्रवारपासून (दि. 9) कुकाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे.

सरपंच लताताई अभंग यांच्या थकबाकी भरण्याच्या आवाहानास माजी सरपंच एकनाथ कावरे, दौलतराव देशमुख, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, सदस्य सुजाता देशमुख, गणेश निकम, सागर गोर्डेे, राजेंद्र खराडे, मच्छिंद्र जाधव, कारभारी गोर्डेे, उमाकांत सदावर्ते, हकिमाबी शेख, यांचेसह नागरीकांनी प्रतिसाद दिल्याने थकबाकी वसुल होवून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे सरपंच अभंग यांनी सांगितले.

उपसरपंचांनी राजीनामा द्यावा

गावचा पाणी पुरवठा खंडीत झाल्याने पाणीपट्टी वसुलीसाठी उपसरपंचांनी वसुली मोहिमेत सहभागी होणे आवश्यक होते. मात्र त्यांच्याकडून विकास कामांत खोडा घातला जात असल्याचा आरोप सदस्या सुजाता देशमुख यांनी केला. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारुन त्यांनी उपसरपंच पदासह सदस्यत्वाचाही स्वखुशीने राजीनामा द्यावा अशी मागणी सुजाता देशमुख यांनी केली आहे.

थकबाकी भरणार्‍यांना पुष्पगुच्छ

ज्यांनी ज्यांनी थकबाकी भरली अशा नागरिकांचा सरपंच अभंग, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ते पाहून अन्य नागरिक थकबाकी भरण्यास पुढे आले.
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनीही वसुलीसाठी धावाधाव केली. परिणामी थकबाकी वसूल होवून पाणी पुरवठा सुरळीत झाला. राहिलेल्या नागरिकांनी थकबाकी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अभंग यांनी केले आहे.

Back to top button