पुनतगाव बंधार्‍यासाठी नवीन फळ्या मंजूर ; पाणी गळतीला बसणार आळा | पुढारी

पुनतगाव बंधार्‍यासाठी नवीन फळ्या मंजूर ; पाणी गळतीला बसणार आळा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  पुनतगाव बंधार्‍याच्या 218 फळ्या तातडीने बदलण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकीकरण विभागाकडून नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता. फळ्या बदलल्यानंतर बंधार्‍याच्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर रोखली जाणार आहे. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या प्रवरा नदीवरील पुनतगाव बंधार्‍याच्या अनेक फळ्या नादुरुस्त झाल्याने पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढलेले आहे. सन 2010 ते 2011 मध्ये फळ्या बदलण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी ही बाब आ. शंकरराव गडाख यांच्या निदर्शनास आणून दिली व तातडीने नवीन फळ्या बसवून पाणी गळती रोखण्याची मागणी केली होती.

आमदार गडाख यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडेे पाठपुरावा केल्यानंतर पुनतगाव बंधार्‍याचे सर्वेक्षण करण्यात आले असून, बंधार्‍यावरील एकूण 434 पैकी 218 फळ्या तातडीने बदलण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल संबंधित विभागामार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार 218 फळ्या तातडीने बदलण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकीकरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुनतगाव बंधार्‍याची पाणी साठवण क्षमता 89 दशलक्ष घनफूट एवढी आहे. या बंधार्‍यामुळे पुनतगाव, पाचेगाव, गोणेगाव, निंभारी, खुपटी, चिंचबन या गावांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेती हिरवीगार होऊन पिके बहरणार आहेत.

Back to top button