नगर : जिल्ह्यात सूडाचे राजकारण, संवेदनशीलता संपली : बाळासाहेब थोरात | पुढारी

नगर : जिल्ह्यात सूडाचे राजकारण, संवेदनशीलता संपली : बाळासाहेब थोरात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर-मनमाड, नगर – पाथर्डी, नगर – सोलापूर रस्त्यांप्रश्नी आमदार नीलेश लंके यांनी गेल्या तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणाचे वाईट वाटते. सत्तेत असताना आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही. आमदार लंके यांच्या समर्थनात जनतेने रस्तारोको केला तर, प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असे सांगून काँग्रेसचे विधान सभेतील गट नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

रस्त्याप्रश्नी आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थोरात आले होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, विधानसभेतील एक तरुण आमदार जनतेच्या प्रश्नावर उपोषण करीत असल्याचे समजल्यानंतर वाट वळून पाठिंबा देण्यासाठी आलो. तीन दिवस झाले तरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही. खर तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ उपोषणस्थळी भेट देऊन मार्ग काढायला हवा होता.

कारण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री कोण्या एका पक्षाचा नसतो. ते आले नाही म्हणून मार्ग काढण्यासाठी मी आलो आहे. त्यांच्याकडे संवेदनशीलता शिल्लक राहिली नाही. आयपीएस व आयएस अधिकारी असूनही ते उपोषणाकडे फिरकले नाहीत. उपोषण सोडविण्याचा आग्रह अधिकार्‍यांनी करणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. आमदार लंके यांच्या समर्थनात आज ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलन केले तर, प्रशासनाने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कधीच पक्ष पाहत नाहीत. ते संवेदनशील व विकासाचा माणूस आहेत. खासदार भाजपचे असतानाही ते प्रश्न सोडवू शकले नाही. सध्या जिल्ह्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. पण हे चालणार नाही. त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल.

जनतेला बरोबर घेऊन मार्ग काढू

आमदार नीलेश लंके यांच्या उपोषणासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. आपण करतो चांगल्या हेतूने मात्र, पुढची माणसं संवेदनशील असणे आवश्यक आहे. आपण उपोषण सोडून जनतेपर्यंत जाऊ आणि लोकांना बरोबर घेऊन उठाव करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढू असे ग्वाही आमदार थोरात यांनी दिली.

Back to top button