माठ ग्रामपंचायत: हत्ती गेला अन् शेपूट राहिले ! सात जागा बिनविरोध; दोन सदस्यांंसाठी निवडणूक | पुढारी

माठ ग्रामपंचायत: हत्ती गेला अन् शेपूट राहिले ! सात जागा बिनविरोध; दोन सदस्यांंसाठी निवडणूक

 देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील माठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊपैकी सात जागा बिनविरोध झाल्या; मात्र सरपंचपदासह सदस्यपदाच्या केवळ दोन जागेसाठी निवडणूक लागली आहे. माठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. सरपंचपदासह सदस्यांच्या नऊ जागेसाठी एकूण 22 इच्छुकांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये सुरुवातीला वार्ड तीनमध्ये मच्छिंद्र बाबा घेगडे, रुपाली संजय देविकर व माधुरी विलास घेगडे यांचा एकमेव अर्ज असल्याने हे तीनही उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यानंतर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.7) आणखी चार उमेदवार बिनविरोध झाले. मात्र, सरपंचपदासह सदस्यांच्या केवळ दोन जागा बिनविरोध करून संपूर्ण निवडणूकच बिनविरोध करण्यात गावनेत्यांना अपयश आले.

वार्ड एकमध्ये सागर हनुमंत बोरगे बिनविरोध झाले, तर विलास साहेबराव पवार विरोधात दादाभाऊ जयवंत धुळे आणि हौसाबाई संतोष खेडकर विरोधात जयश्री राजेंद्र घेगडे यांच्यात निवडणूक होणार आहे. तसेच, वार्ड दोनमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील मुगुटराव घेगडे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र अश्रू घेगडे यांनी निवडून येण्याची खात्री असतानाही निवडणूक बिनविरोध करायचीच या हेतूने मनाचा मोठेपणा दाखवत स्वतःपहिल्यांदा आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे मग आणखी तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने हितेश विनायक घेगडे, स्वाती संजय घेगडे आणि अश्विनी संभाजी घेगडे, असे तीन उमेदवार सर्वानुमते बिनविरोध झाले.

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांतर्फे जनतेतून असणारे सरपंचपद बिनविरोध करताना अरूणा विश्वनाथ पवार यांना सर्वानुमते पसंदी दिली. मात्र, किरण गुलाब पवार यांनी माघार न घेतल्याने आपला अपक्ष अर्ज कायम ठेवत सरपंचपदासाठी समोरासमोर निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रेवजी घेगडे, किशोर घेगडे, रामदास खेडकर, शरद घेगडे, भास्कर घेगडे, अप्पा खेडकर, उमेश घेगडे, विलास घेगडे, रावसाहेब पवार, अमोल देविकर आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सरपंचपदासह सदस्यांच्या दोन जागांवर निवडणूक लागल्याने हत्ती गेला अन् शेपूट राहिले, अशी परिस्थिती झाली.

Back to top button