आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी : भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे | पुढारी

आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी : भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  नगर-मनमाड व नगर-पाथर्डी-नांदेड रस्त्याच्या कामावरून खासदार व भाजपला टार्गेट केले जात आहे. मात्र, ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम रखडले ही वस्तुस्थिती आहे. येत्या आठ दिवसांत त्या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात आघाडी सरकारच्या काळात एकाही रस्त्याचे काम झाले नाही. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे उपोषण केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी केला. नगर-मनमाड व नगर-पाथर्डी-नांदेड रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

त्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भारतीय जनता पक्षावर राष्ट्रवादीकडून टीकेची झोड उठविण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी भाजपने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे आरोप खोडून काढले. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले, आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून अशी राष्ट्रवादीची परिस्थिती झाली आहे. आमदार नीलेश लंके यांनी दोन्ही रस्त्याची संपूर्ण माहिती घेतली व त्यानंतर उपोषणाला बसले. 2014 मध्ये रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्याची टेंडर प्रक्रिया होऊन 540 दिवसांत काम करण्यास मुदत ठेकेदाराला दिली. परंतु, निकृष्ट दर्जामुळे काम बंद पडले. त्या ठेकेदाराचे काम रद्द करण्यात आले. पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया झाली. कोविड, अतिवृष्टीमुळे रस्त्याचे काम प्रलंबित राहिल. पुढे राष्ट्रीय हरित लवादने उत्खन्न बंद केल्याने काम लांबत गेले.

51 किलोमीटरपैकी 43 किलोमीटरचे काम पूर्ण झाले. अनेक ठिकाणी वळणावर काम जैसे थे राहिले. त्यात पुढे इंगवले कंपनीने काम थांबविले. खासदार, आमदार यांच्या त्रासामुळे काम थांबविले नाही तर, ठेकेदाराने स्वतःच्या अडचणीमुळे काम थांबविले आहे. तसे लेखी पत्र त्याने राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणला दिले आहे. आठ दिवसांत रस्त्याची टेंडर प्रक्रिया होणार आहे. त्या रस्त्यासाठी नव्याने 798 कोटी मंजूर झाले आहेत. 2023 अखेर रस्त्याचे काम पूर्ण होईल.

आ. लंकेंनी खासदार विखेंशी चर्चा करावी

आमदार नीलेश लंके यांनी रस्त्याच्या कामाचे भांडवल करू नये. त्यांनी रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयात येऊन चर्चा करावी. कामासंदर्भात नेमक्या काय अडचणी आहेत ते समजून घ्यावे. कोण येऊन भेटल्यानंतर आमदार उपोषण सोडतील, असाही सवाल मुंडे यांनी केला.

Back to top button