

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात 3 जानेवारी 2023 रोजी पहिले स्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा मिळावा आणि स्री सक्षमीकरणाचा जागर व्हावा, या उद्देशाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील स्त्रिीशिक्षिका साहित्यिक सहभागी होणार आहेत. साहित्यिक स्रीशिक्षिकांना सशक्त विचारपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांचे अर्थविश्व व नव तंत्रज्ञानाच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्य विश्वाकडून स्री शिक्षकांच्या असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी हे एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मीनाताई जगधने उपस्थितीत राहतील. प्रमुख अतिथीमध्ये कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्यराजेंद्र फाळके संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर आमदार रोहित पवार हे साहित्य संमेलनाचे निमंत्रक आहेत.
एकदिवशीय स्रीशिक्षिका साहित्य संमेलनात सकाळच्या सत्रात उद्घाटटन सत्र व साहित्यिक स्रीशिक्षिकांचा पुरस्कार वितरण समारंभ होईल. बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा राजेंद्र पवार, यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात डॉ. प्रतिभा जाधव, (लासलगाव) यांच्या 'मी अरुणा बोलतेय' व प्रा. कविता म्हेत्रे, (म्हसवड-सातारा) यांच्या 'मी सावित्री बोलतेय' या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण होईल. उषाताई अक्षय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दुसर्या सत्रात 'आजच्या मनोविश्वातून सावित्री हरवत चालली आहे?' या विषयावरील परिसंवादात डॉ. वंदना महाजन, (मुंबई विद्यापीठ), डॉ. वृषाली मगदूम, सामि जककार्यकर्त्या मीरा सातपुते, स्नेहा बाळसराफ, बोलणार आहेत.
तिसर्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री संमेलन होईल. त्यात स्वाती पाटील (कर्जत), उज्ज्वला जाधव (कर्जत), अंजली कुलकर्णी (पुणे), स्नेहा कोळगे (मुंबई), रचना (शेवगाव), मधुश्री ओव्हाळ (पुणे), संगीता झिंजुर्के (बीड), संगीता फासाटे (श्रीरामपूर), शुभांगी भालेराव (कर्जत), जस्मिन शेख (मिरज), सुरेखा बोराडे (नाशिक), समृद्धी सुर्वे (पुणे), ज्योती धनवे (बीड), शिवकन्या साळुंके (अंबाजोगाई), प्रतिभा खैरनार (नांदगाव-नाशिक), पारमिता षडगीं (ओरिसा) आदि कवयित्री सहभागी होणार आहेत.
या संमेलनामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणार्या व सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणार्या शिक्षिकांना सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, मुक्ता साळवे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, दुर्गा भागवत, नजूबाई गावित, गेल ऑम्वेट, बाया कर्वे, भूमिकन्या आदिंच्या नावे संमेलनामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संमेलनामध्ये स्री-शिक्षिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्र.प्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.