जामखेड : जन्मभूमीतील कामांनाही स्थगिती ; आ. रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका | पुढारी

जामखेड : जन्मभूमीतील कामांनाही स्थगिती ; आ. रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका

जामखेड : पुढारी वृतसेवा :  स्वतः मंत्री असताना झोपलेले राम शिंदे आता अचानक जागे झाले आहेत. मात्र, आपण केलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे फुकटचं श्रेय घेण्यासाठी हवेत गेलेलं त्यांचं विमान लॅण्ड होण्यास मदत होईल, असा सणसणीत टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. जामखेड येथील नळ पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजना मंजूर केल्याबद्दल जामखेड ग्रामस्थांच्या वतीने जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, प्रदेश सरचिणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, विकास राळेभात, शहाजी राळेभात, रमेश आजबे, नगरसेवक पवन राळेभात, महेश निमोणकर, प्रशांत राळेभात, अमित जाधव, राहुल पाटील, गणेश चव्हाण उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले, यापूर्वी मंत्रीपद सांभाळूनही माझ्या विरोधकांना जीआर कळत नसेल तर, त्यांच्या माहितीसाठी पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण तपशील तारखेनुसार सोप्या भाषेत बोर्डावर लावला आहे.

कोणाला या योजनेचाही तपशील हवा असेल तर, तोही दिला जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विकासकामांना निधी मंजूर करून घेणे व कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले व कुठलेही काम रद्द किंवा स्थगित करण्याचा प्रयत्न केला नाही. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायचो, तेव्हा स्वाक्षरी करतो, असे मुख्यमंत्री सांगत होते; परंतु कामाचे श्रेय रोहित पवारांना जाऊ नये, यासाठी माझे विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दबाव आणत होते आणि स्वतःला श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते.

आघाडी सरकार असताना चौंडीसाठी 35 कोटींचा निधी दिला. राम शिंदे हे आमदार आणि मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एक रुपयाचेही काम या ठिकाणी झाले नाही. या ठिकाणी असलेल्या वाड्याला घाट असावा, अहिल्यादेवींचे कार्य नवीन पिढीला समजण्यासाठी संग्रहालय आणि गावाला भव्य वेस असण्यासाठी साडेसात कोटींचा निधी आपण मंजूर केला होता. आमदार शिंदे यांनी या विकासकामांना स्थगिती आणली आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी त्यांनी या कामांना खोडा घातला असल्याचे आ. रोहित पवार म्हणाले.

Back to top button