राहुरी : म. फुले कृषी विद्यापीठाच्या 7 नवीन वाणांना मान्यता

राहुरी : म. फुले कृषी विद्यापीठाच्या 7 नवीन वाणांना मान्यता
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ व उडदाच्या वाणांना भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. उसाचा फुले 11082 (कोएम 11082), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा आणि उडदाचा फुले वसु या वाणांचा समावेश आहे. ऊस पिकाचा फुले 11082 हा लवकर पक्व होणार्‍या वाणाचे ऊस उत्पादनात 15.40 टक्के, साखर उत्पादन 13.52 टक्के, हा वाण तुल्यवाण कोसी 671 पेक्षा सरस आढळून आला आहे. साखर उतारा कोसी 671 इतकाच 14.17 टक्के मिळाला आहे. या वाणाचा वाढीचा वेग जास्त असून फुटव्यांची संख्या मर्यादित आहे. वाढ्यावर कुस नाही. हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आला आहे.

गव्हाचा सुधारीत वाण फुले अनुपम (एन.आय.ए.डब्ल्यु. 3624) या वाणाची महाराष्ट्रामध्ये नियंत्रित पाण्याखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. हा वाण आकर्षक टपोरे दाणे, प्रथिनांचे प्रमाण 11.4 टक्के असून तांबेरा रोगास प्रतिकारक्षम तसेच चपातीसाठी उत्तम वाण आहे. याचा पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस असून उत्पादन क्षमता 30 ते 35 क्वि./हे. असणार्‍या या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.

रब्बी ज्वारीचा फुले यशोमती (आर.एस.व्ही. 1910) हा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 9.3 क्वि. असून उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 12.00 क्वि. आहे. तूरीचा फुले तृप्ती (पी.टी.10-1) हा वाण देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 22.66 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 32.00 क्विंटल इतकी आहे.

तुरीचा दुसरा वाण फुले कावेरी (पी.टी.11-4) हा देशाच्या दक्षिण विभागातील तामिळनाडु, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि ओडीशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत तसेच बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 15.91 क्विंटल उत्पादन मिळते. तीळ या पिकाचा जे.एल.टी. 408-2 (फुले पूर्णा) हा वाण महाराष्ट्रातील खान्देश आणि मराठवाडा विभागातील उन्हाळी हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला आहे. याचे उत्पादन 705 किलो प्रति हेक्टर असून यामध्ये तेलाचे प्रमाण 49 टक्के आहे.

याचा एकुण पक्वता कालावधी 95 ते 100 दिवसांचा असून 1000 दाण्यांचे वजन 4 ग्रॅम इतके आहे. हा वाण पानावरील ठिपके व पुर्णगुच्छ रोगासाठी प्रतिकारक असून पाने गुंडाळणारी अळी व फळ पोखरणार्‍या अळीसाठी सहनशील आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संशोधन संचालक व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व विद्यमान संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये संशोधन केंद्रातील सहकार्‍यांनी या वाणांसाठी पुढाकार घेतला. या शास्त्रज्ञांना इतरांचेही मोठे सहकार्य लाभलेले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शेतकर्‍यांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा कायम आहे. यावर्षी देखील राष्ट्रीय स्तरावर सात वाणांना मान्यता देण्यात आली, याचा फायदा निश्चितच शेतकर्‍यांना होणार आहे.
                                                               – डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news