लोणी : अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईवर विखे पाटील ठाम | पुढारी

लोणी : अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईवर विखे पाटील ठाम

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्हावी ही सामान्य माणसाचीच इच्छा होती. अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्खननाबाबत सरकारने सुरु केलेल्या करवाईमुळे बेकायदेशिर व्यवसायाला मोठा लगाम बसणार आहे. शासनाचे दायित्व बुडवून सुरु असलेला हा व्यवसाय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का? असा सवाल करत अवैध उत्खनना विरोधात कारवाई सुरुच राहील असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

विखे पाटील यांनी लोणीत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अवैध गौण खनीज उत्खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्यात कारवाई सुरु आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्यक्ति, पक्षाविरोधात नाही, परंतू त्यांना वाईट वाटणे स्वभाविक आहे असे स्पष्ट करुन, आजपर्यंत राजकीय दबावापोटी कारवाया होत नव्हत्या. प्रशासनाने सुध्दा या अवैध धंद्याकडे डोळेझाक केली होती. सरकारचे अब्जावधी रुपयांचे दायित्व बुडविले जात होते.

महसूल खात्यातील अनेक आधिकार्‍यांवर या माफीयांकडून हल्ले झाले, त्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडले. यासर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पाऊल उचलली आहेत. या सर्व बेकायदेशिर उत्खनना विरोधात सरकारची कारवाई सुरुच राहील असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले. सरकारने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत याचा तरी खुलासा त्यांनी करावा. अवैध उत्खनन करणार्‍यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल विखे पाटील यांनी केाला. सरकारने सुरु केलेल्या कारवाईचे सर्वांनी समर्थन केले पाहीजे, गौण खनिजाच्या कारणामुळे एकही सरकारी काम बंद पडणार नाही.

निळवंडे कालव्यांच्या कामासाठी गौण खनीज उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना व आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. गौण खनीज उपलब्धततेचे आधिकार प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले असून, राज्यात गौण खनीज आणि वाळू संदर्भात सरकार लवकरच धोरण आणून यासर्व व्यवसायामध्ये पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री विखे म्हणाले.

Back to top button