नगर : रस्त्यांचे कामे सुरू झाल्याशिवाय हटणार नाही ; आ. नीलेश लंके यांचे उपोषण सुरू

नगर : रस्त्यांचे कामे सुरू झाल्याशिवाय हटणार नाही ; आ. नीलेश लंके यांचे उपोषण सुरू

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर-पाथर्डी-शेवगाव, नगर-राहुरी-कोपरगाव व नगर-मिरजगाव-टेभुर्णी या रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते अपघात होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. अशा परिस्थितीतही सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्यांची कामे तत्काळ सुरु व्हावे, या मागणीसाठी आमदार नीलेश लंके यांचे नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु झाले. तिन्ही रस्त्यांचे काम जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषणापासून हटणार नाही. पोलिसाकरवी अटक झाली तरी बेहत्तर, मात्र जेथे कोठे नेले जाईल तेथे उपोषण सुरुच ठेवणार, असा इशारा आमदार लंके यांनी सरकारला दिला आहे.

तिन्ही महामार्गाच्या दुरवस्थेने जवळपास चारशे बळी घेतले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या यंत्रणेने याची दखल घेतली नाही. त्यामुळे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देत 7 डिसेंबरला पाथर्डी, शेवगाव व इतर तालुक्यांतील नागरिकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अद्यापि या निवेदनाची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार लंके यांनी बुधवारी दुपारपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी दत्त जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात औदुंबराचे झाड लावले.

यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम शेलार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब थिटे, माजी सभापती बाळासाहेब हराळ, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अंकुश रावसाहेब शेळके, केदारेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश ढाकणे, माजी नगरसेवक विक्रम राठोड, शिवशंकर राजळे, श्याम आसावा, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे, अंबादास गारुडकर, अ‍ॅड हरिहर गर्जे, अ‍ॅड. सतीश लगड, किसनराव लोटके यांच्यासह पारनेर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण दरम्यान, अनेकांनी भाषणे करीत आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.

मतदारसंघातील रस्त्यांची कामे चांगली करणे ही जबाबदारी संसद सदस्यांची आहे. मात्र, तेच हेलिकॉप्टरने फिरतात. त्यामुळे त्यांना जनतेच्या हिताची काळजी नाही, अशी टीका नगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी केली. रस्त्यांची कामे उत्तम व्हावीत, या साध्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींवर उपोषण करण्याची वेळ येते, ही लाजिरवाणी बाब आहे. या उपोषणाला खरे तर सर्वानीच पक्षभेद सोडून पाठिंबा देण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. श्याम आसावा यांनी म्हटले. याप्रकरणी खरे तर खासदारांनी राजीनामा देण्याची गरज आहे. नाकर्त्या खासदारांना आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वास लोणी बु. येथील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी व्यक्त केला आहे. आमदार लंके यांनी आंदोलनाचा इशारा देताच विद्यमान खासदारांना जाग आली आहे.

ठेकेदारांकडे कोणी टक्केवारी मागितली, याचे पोस्टर सोशल मीडियावर फिरत आहेत. वाढत्या अपघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. रस्त्यांसाठी उपोषणाची वेळ का आली याचे आत्मपरिक्षण खासदारांनी करावे, असे आवाहन माजी खासदार दिवंगत दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री आ. लंके यांची भेट घेत उपोषण सोडण्याची मागणी केली. मात्र आ. लंके यांनी उपोषणावर ठाम राहत अगोदर कृती करा असे सुनावले. रात्री उपोषणादरम्यान भजन झाले.

लोणी खुर्दच्या घोगरेंंचा लंकेंना पाठिंबा

उपोषणाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार दिवंगत चंद्रभान घोगरे पाटील यांच्या सूनबाई प्रभाताई जनार्धन घोगरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. नगरला यायला अडीच तास लागले. आमच्या तालुक्यातील नेत्यांनी विविध पक्षांत जावून अनेक पदे भूषविली. मात्र त्यांना नगर-कोपरगाव रस्ता दुरुस्त करता आला नाही, अशी टीका त्यांनी विखे घराण्यावर केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या रस्त्यावर फिरवा, असे आवाहन त्यांनी केले. अगोदर राज्यातील रस्ते तयार करा मगच हेलिपॅड तयार करा, असे आवाहन देखील त्यांनी सरकारला केले आहे. स्वत:च्या हिंमतीवर आमदार होणार्‍या लंकेच्या उपोषणाला शिर्डी मतदारसंघातील जनतेचा पाठींबा असल्याचे प्रभाताई घोगरे यांनी सांगितले.

मोठ्या लोकांवर काय बोलणार : आमदार लंके

उपोषणाला बसताच आमदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोठ्या लोकांवर काय बोलावे, असा टोला त्यांनी विखे पिता-पुत्रांना लगावला. वाढत्या अपघातामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेकदा निवेदने देऊन सरकाला जाग येत नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणाचे हत्यावर उपसावे लागले असल्याचे आमदार लंके म्हणाले. मात्र, जोपर्यंत या रस्त्यांची कामे मार्गी लागत नाही. तोपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नाही. त्यासाठी अटक करुन मला रुग्णालयात दाखल केले तरी तेथेही उपोषण सुरुच ठेवणार असा इशारा आमदार लंके यांनी दिला. सिद्ध करा आम्ही दोघेही आमदारकीचा राजीनामा देऊ.

नगर- मनमाड राष्ट्रीय मार्गाचे काम करणार्‍या ठेकेदारांना आमदारांनी पळवून लावले असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केल्याकडे आमदार लंके व आमदार तनपुरे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी केलेले आरोप सिध्द करावेत. ते आरोप सिध्द केल्यास आम्ही दोघे आमदारकीचा राजीनामा देऊन असे प्रत्युत्तर आमदार लंके यांनी दिले. आपले अपयश झकण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील असले आरोप करीत आहेत. त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही, असे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलनाता सांगितले.

हेलिकॉप्टरचा दिवसभर उल्लेख

बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर तालुक्यांतील नागरिकांची गर्दी झाली होती. दिवसभर सुरु असलेल्या विविध कार्यकर्त्यांच्या भाषणाने परिसर दुमदुमला होता. विखे पाटील कुटुंबाच्या वतीने सध्या हेलिकॉप्टरचा वापर सुरु आहे. त्यांना रस्त्यांवरील खड्डे कसे दिसणार? अशी खोचक टीका अनेकांनी भाषणातून केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news