संगमनेर : वाळू, गौण खनिजाच्या नावे दहशतीचे राजकारण : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : वाळू, गौण खनिजाच्या नावे दहशतीचे राजकारण : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवी पद्धत अ. नगर जिल्ह्यात राबविली जात आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘काही’ मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी मंजूर झालेली विकास कामे थांबविली जात आहेत, अशा शब्दात नाराजी व्यक्त करुन, गौण खनिज उत्खननासह वाळू उपशावरील कारवाईच्या नावाखाली दहशतीचे राजकारण सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते, आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे नाव न घेता केला.

संगमनेरात ते माध्यमांशी बोलत होते. आ. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातही, राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध प्रकल्प व योजनांना मंजुरी दिली होती, तथापी नव्याने सत्तेत आलेले शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली, असे सांगत, जिल्ह्यातील काही मंडळींनी त्याहीपुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांनासुद्धा स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामांसह प्रगतीपथावरील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामेसुद्धा ठप्प झाल्याचा गंभीर आरोप आ. थोरात यांनी ना. विखे यांचे नाव न घेता केला.

वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली काहीजण राजकीय कारवाया करीत कोट्यवधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करीत उद्योग, व्यावसायिकांना वेठीस धरीत आहेत. या बेकायदेशीर कारवायांमुळे घरे, रस्ते व सरकारी कामेसुद्धा बंद पडली. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. सध्या शिंदे- फडणवीस सरकारच्या राजकीय कारवाया सर्व तालुक्यांमधील परंपरेला छेद देणार्‍या आहेत, अशी खंत आ. थोरात यांनी व्यक्त केली.  राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण जिल्हाच काहींनी वेठीस धरला. मिळालेल्या सत्तेतून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे सोडून ते विकासकामे थांबवित असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला.

काहीजण ‘निळवंडे’ रखडविण्याच्या प्रयत्नात..!

उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची शेती ओलिताखाली येण्यासाठी निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जोरात सुरू होती, परंतु शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर गौण खनिज बंद करून काहीजण हा प्रकल्प रखडविण्यासह दुष्काळी भागाला पाणी मिळू नये म्हणून षड़यंत्र रचत असल्याचा आरोप माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला.

Back to top button