शरद पवार यांच्यामुळे भारत अन्नधान्य निर्यातदार : जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे | पुढारी

शरद पवार यांच्यामुळे भारत अन्नधान्य निर्यातदार : जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्योत्तर काळात देशात अवघे 50 दशलक्ष टन धान्याचे उत्पादन होत असे. लोकसंख्येला पुरेसे उत्पादन होत नसल्याने अन्नधान्य आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सांगत 1972 च्या दुष्काळात पाणी होते, पण धान्य नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली. ही सल मनात ठेवून तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सत्तासुत्रे हाती येताच दूरदृष्टीचे नियोजन करून, अन्नधान्य आयात करणार्‍या भारत देशाला धान्य निर्यातदारांचा देश बनविण्याची किमया करून दाखविली, असे सांगत चिकित्सक अभ्यास व धोरणांच्या नियोजनबद्ध मांडणीमुळे शरद पवार दुसर्‍या हरित क्रांतीचे जनक ठरले, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. सुधीर भोंगळे यांनी केले.

येथील रयत शैक्षणिक संकुल महाविद्यालय विकास समिती आयोजित पद्मविभूषण, माजी केंद्रीय मंत्री शरद यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त ‘मा. खा. शरदचंद्र पवार जीवन व कार्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. भोंगळे यांनी शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासह त्यांचे राजकारण, शेती, शिक्षण आदी आकाशाला गवसणी घालणार्‍या व्यापक कार्याचा आढावा मांडला.
अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपुरच्या चेअरमन मीनाताई जगधने यांनी भूषविले. अध्यक्षस्थानावरून मीनाताई जगधने यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या व्यापक कार्याचा संक्षिप्त व मार्मिक शब्दांत गौरव केला. आई, वडिलाचे सुसंस्कार व पवार घराण्याच्या उदात्त विचारांच्या वारस्याचा एकेक पदर त्यांनी हळूवारपणे उलगडत चिंतणीय विचार मांडले. शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाबद्दलच्या निवडक पैलुंवर विचार मांडताना त्या म्हणाल्या, ‘भर पावसात भाषण करणारे शरद पवार यांचे कार्य अतुलनिय आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे प्रमुख पाहुणे होते.  व्याख्याते डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले,  खरेतर जगाच्या अन्नधान्याची काळजी वाहणारे शरद पवार हे शेतकर्‍यांचे मसिहा होत. आपल्या दिशादायी कर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्रावर अनंत उपकार करून ठेवले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात येताना सत्याची बाजू घेणारी त्यांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरली आहे. देशावर नैतिक दडपण असलेले पवार हे जुन्या- नव्याचा संगम असलेला पूल आहे. हा पूल देशाला खूप महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा विरोध सहन करावा लागला, मात्र तेव्हा एकमेव शरद पवार यांनी आपल्याला साथ दिल्याचे दस्तुरखुद्द मोदी सांगतात, याचा डॉ. भोंगळे यांनी आवर्जून उल्लेख केला.
प्रास्तविक प्र. प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे यांनी केले. यावेळी डॉ. रविंद्र जगधने, डॉ. राजीव शिंदे,जनरल बॉडी सदस्य बाप्पुसाहेेब पटारे, प्राचार्य मुकूंद पोंधे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. सी. पवार, उपप्राचार्य डॉ. सुनील चोळके, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्या सुजाता पोखरकर, डी.डी. काचोळे विद्यालय मुख्याध्यापक सुनील साळवे, एस. के. सोमय्या विद्यालय मुख्याध्यापिका सोनाली पैठणे रजिस्ट्रार एस.के.राऊत, अधीक्षक के. एम. जाधव आदींसह प्राध्यापक व रयत सेवक उपस्थित होते.फफ

पवार साहब करेंगे, तो सब हो सकता है !

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही, असे सांगत डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत जातो, तेव्हा प्रादेशिक असो वा देश पातळीवरील प्रत्येक राज्यातील महान हस्ती समस्या सोडविण्यास मोठ्या आशेने, अपेक्षनेे पाहते अन् ती सुटताच म्हणते, ‘पवार साहब हैं तो सब कुछ हो सकता हैं!

रयत शिक्षण संस्थेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे प्रदीर्घ 50 वर्षे योगदान आहे. त्यांचा केवळ 82 वा नव्हे तर आपण 100 वा वाढदिवस साजरा करू. राजकारणासह त्यांचे कृषी, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्याचा मोठा अवाका आहे. 2019 मध्ये पावसात सभा घेत त्यांनी विधान सभेचे रणांगण जिकंले. त्यांच्यामुळे मी निवडून आलो, आमदार झालो. कामावरील प्रचंड श्रद्धा व जनमानसांप्रती सतत प्रेम बाळगणारे पवार यांचे व्यक्तिमत्व अवघ्या महाराष्ट्राला ऊर्जा देते.
                           – आ. आशुतोष काळे, ‘रयत’ उत्तर नगर अध्यक्ष

आयुष्याच्या उत्तरार्धातही शरद एक्स्प्रेस सुसाट वेगाने पुढे जात आहे. त्यांचे मन अजूनही तरुण असून, माणसांचा सहवास हेच त्यांच्या जिवनाचे टॉनिक आहे. शरदरावांचे व्यक्तित्व अष्टपैलू आहे. व्यापक दूरदृष्टी, कार्यकुशलता, धडपडी वृती, संघटन कौशल्य, नियोजनबद्धता व सामाजिक बांधिलकी या गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणातून समाजकारण केले.
          – मीनाताई जगधने, ‘रयत’ मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, रयत शैक्षणिक संकुल चेअरमन

Back to top button