

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर- औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेल समोरील चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी तपोवन रस्ता परिसरातील नागरिकांनी नगरच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता व विभाग क्रमांक दोन उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची प्रत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही देण्यात आली.
कर्डिले यांना वारंवार घडणारे अपघात व वाढती वर्दळ पाहता गतिरोधक बसविण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. इंद्रायणी चौकातील हॉटेल समोर तपोवन परिसरातून येणार्या जाणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पावधीतच इंद्रायणी बस स्टाप निर्माण झाला असून, तपोवन वासियांना नगरमध्ये जाण्या- येण्यासाठी हा रस्ता सोईस्कर आहे. तसेच, या चौकात हॉटेल व्यवसाय जोरात असून याच चौकात तीन मंगल कार्यालय, मार्बल स्टाईलचे व्यवसायीक असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते.
तपोवन परिसर मोठ्या प्रमाणात विकसीत होत असूनल, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, भाजीपाला व्यवसायिक, बांधकाम व्यवसायिक जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर या चौकाचा वापर करत आहेत. याच रस्त्यावर नको त्या ठिकाणी गतिरोधक आहेत पाहिजे, त्या ठिकाणी गतिरोधक नाहीत,असा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इंद्रायणी चौकात गतिरोधक बसवावेत, या आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला दिले. निवेदनावर संदीप पालवे, दत्तू शिरसाठ, अशोक काळे, लक्ष्मण काळे, स्वप्निल कासवा, एस. रहेमान खान, संदीप किनगे, विक्रम आव्हाड, संतोष लोंढे, सोमनाथ नजन, गोरक्षनाथ दरवडे, रवींद्र कैदके, आसाराम लाहोटी, भगवान आव्हाड आदींसह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.