पिंपरी : एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जगतापांकडे | पुढारी

पिंपरी : एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जगतापांकडे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांना डावलून प्रदीप जांभळे यांची नियुक्ती झाली आहे. असे असताना जाणीवपूर्वक जांभळे यांच्या नियंत्रणाखाली झगडे यांचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग देण्यात आला. या दोन अधिकार्‍यांत झालेले वाद चव्हाटावर आल्याने अखेर झगडे यांचा विभाग अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या नियंत्रणात देण्यात आला आहे. राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी पालिकेच्याच उपायुक्त असलेल्या झगडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांना रूजू करून घेतले नाही.

अखेर ती नियुक्ती रद्द होऊन त्या जागी प्रदीप जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली. ते रूजू झाल्यानंतर सर्व तीन अतिरिक्त आयुक्तांच्या विभागांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला. मात्र, उपायुक्त झगडे यांच्याकडील एलबीटी विभाग जाणीवपूर्वक जांभळे यांच्या नियंत्रणाखाली देण्यात आला. दरम्यान, पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याबद्दल झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितली. त्यात त्यांनी राज्य शासन, पालिका आयुक्त सिंह व अतिरिक्त आयुक्त जांभळे यांना प्रतिवादी केले आहे.

दुसरीकडे, नियमित बैठका व सभेला उपस्थित राहत नसल्याने जांभळे यांनी झगडे यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे. त्यासंदर्भात पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. ते वाद वाढत जाऊ नये म्हणून आयुक्तांनी झगडे यांचा एलबीटी विभाग अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडून काढून घेतला आहे. तो विभाग अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे सोपविला आहे.

Back to top button