कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत बसस्थानकातील स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी नाही. यामुळे स्वच्छतागृहामध्ये घाण झाल्याने त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकावर रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी, तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी येतात. त्यांच्याकडून स्वच्छतागृहामध्ये पसरलेली दुर्गंधी आणि अस्वच्छता पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या स्वच्छतागृहाची जबाबदारी नगरपंचायतीने घेतलेली आहे. व्हीडीके या कंपनीला संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा ठेका एक कोटी 80 लाख रुपयाला दिलेला आहे. यामध्ये बसस्थानकातील स्वच्छतागृहाचा देखील समावेश आहे. असे असतानाही येथील स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास प्रवासी आणि नागरिक यांना सहन करावा लागत आहे. या स्वच्छतागृहाची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.