नेवासा : पोलिस निरीक्षकास धक्का देत दुचाकीस्वारांनी केले पलायन | पुढारी

नेवासा : पोलिस निरीक्षकास धक्का देत दुचाकीस्वारांनी केले पलायन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस निरीक्षक विजय करे यांना धक्का देत पलायन केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत डांबरी रस्त्यावर पडल्याने पोलिस निरीक्षक करे जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप कुर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक करे हे शनिवारी (दि.3) सरकारी गाडीतून शेवगाव पोलिस ठाण्याकडून नेवासा येथे येत होते. नेवासा फाटा-नेवासा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर कॉलेजजवळील रस्त्यावर एक पांढर्‍या रंगांच्या विनानंबर पल्सर गाडीवर दोन जण बसलेले होते.

मागील महिन्यात कॉलेजवर झालेल्या भांडणाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पोलिस निरीक्षक करे यांनी पोलिस कर्मचारी कुर्‍हाडे यांना गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरून करे यांनी या दोघांना विनानंबर वाहनाबाबत व इथे का थांबलात, अशी विचारपूस करत चालकास नाव, गाव विचारले. यावर त्या दोघांनी नाव न सांगता पोलिस निरीक्षक करे यांना जोरात धक्का देत, वाहन नेवासा शहराच्या दिशेने पळविले. त्यावेळी करे हे डांबरी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी गाडी चालवित असणारा अरमान जावेद बागवान व त्याच्या सोबत असलेल्या अरबाज रियाज सय्यद अशी नावे सांगितली. त्यानंतर पोलिस निरीक्षक करे यांना उपचारासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी अरमान जावेद बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व अरबाज रियाज सय्यद (रा.नेवासा खुर्द) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पुढील तपास करीत आहेत.

Back to top button