

करंजी : पुढारी वृत्तसेवा : करंजी येथील ग्रामविकास अधिकार्याला पदभार द्यावा, तसेच परिसरातील कचर्याचीही तीन दिवसांत कायमस्वरुपी विल्हेवाट लावावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. करंजी येथे बर्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ग्रामविकास अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून या ग्रामविकास अधिकार्याला चार्ज देण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधितास ग्रामपंचायतीमध्ये हजर करून घेण्यास कोणाचा राजकीय अडसर आहे का, याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, तीन दिवसांत करंजी ग्रामपंचायतीने पदभार सोपवावा, तसेच ग्रामपंचायतने गोळा केलेला कचरा परिसरात टाकला जात असून तो दररोज पेटवून दिला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकण्याची जागा तात्काळ न बदलल्यास पाथर्डी पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार, आरपीआयचे विभाग प्रमुख सतीश क्षेत्रे, राजेंद्र क्षेत्रे, प्रवीण साळवे, दिलीप मोरे, श्रावण थोरात, सुभाष साळुंखे, भाऊसाहेब क्षेत्रे, सुभाष क्षेत्रे किशोर शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.