शिर्डी : भाजपचा खुलासा मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणारा : खा. राऊत | पुढारी

शिर्डी : भाजपचा खुलासा मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणारा : खा. राऊत

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणार्‍या राज्यपालांबद्दल भाजपाने समर्थन दिले नाही, म्हणजे हा काही खुलासा नाही. भाजपाने केवळ मराठी जणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी खोचक टीका खा. संजय राऊत यांनी शिर्डीत केली. खा. संजय राऊत सहपरिवार शनिवारी (दि.3) मंदिरात श्रीसाई दर्शनासाठी आले होते. श्रीसाई संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय शिंदे, सचिन कोते, सुहासराव वहाडणे, राजेंद्र पठारे, स्वाती परदेशी आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले, उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांनी जो भाव व्यक्त केला, तो महाराष्ट्रातील जनता मान्य करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांची खदखद ही त्यांच्या मुखातून व्यक्त होत आहे. 350 वर्षानंतर टकमक टोकाचा वापर होत असेल, तर काय हरकत आहे. त्यांनी समर्थन दिले नाही, याचा अर्थ तुम्ही विरोध केला नाही. तुम्ही धिक्कार केला नाही, कारवाईची मागणी केली नाही, असे सांगत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांवर निंदा प्रस्ताव येण्याची गरज होती. तो प्रस्ताव केंद्राला कळविला पाहिजे होता तसेच केंद्राने राज्यपालांना पुन्हा बोलू द्यावे, हे ज्या पद्धतीने सुरू आहे. यावर त्यांचा खुलासा नाही, याचा अर्थ समर्थन केलं नाही, असा होत नाही. हा मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे, असे खा. राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना सीमाप्रश्न सोडविता आला नाही : राऊत

राज्य सरकार महाराष्ट्रात अस्मिता, स्वाभिमान, विकासाबाबत कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत कहल सुरू आहे. त्यांच्यात दोन गट पडले असून या दोन गटात गँगवार झाले तरी आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. बेळगाव प्रश्न बाबत बोलताना खा. राऊत म्हणाले, मंत्र्यांनी बेळगावमध्ये जावे, याआधी अनेक मंत्र्यांनी तिथे जाऊन आंदोलन केली आहे. जर दोन मंत्र्यांना तिथे जाता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री यांनी तिथे खर्‍या अर्थाने जाणे गरजेचे आहे. त्यांनी 8 वर्षे त्या खात्याचा कारभार सांभाळला तरीही त्यांना सीमा प्रश्न सोडविता आला नाही. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी का जाता येत नाही?, या देशाची फाळणी झाली का ? अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली.

बंदुकीची गोळी खायला तयार !

खासदार संजय राऊत म्हणाले, मी शंभर दिवस जेलमध्ये राहिलो. त्यामुळे आमचा पक्ष मजबूत झाला. आमच्या कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ मिळालं, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्या प्रेरणेने आम्ही कुणासमोर गुडघे टेकणार नाही. अटक झाली तरी चालेल, बंदुकीची गोळी घ्यायला तयार आहोत, अशा कठोर शब्दात खा. संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Back to top button