चोरांची दरदिवशी पोलिसांना सलामी ! पोलिस मात्र कागद रंगविण्यात दंग | पुढारी

चोरांची दरदिवशी पोलिसांना सलामी ! पोलिस मात्र कागद रंगविण्यात दंग

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दुचाकी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरीचे गुन्हे शहरात दर दिवसाला घडत आहेत. शहर पोलिस ठाण्यातील स्वतःला डॅशिंग म्हणून घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना चोरटे रोजच सलामी ठोकत आहेत. खाकीची बेअब्रू होत असताना पोलिस अधिकारी घटनास्थळी न जाता, केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करत असल्याचेही प्रकार होत आहेत. गुन्हा घडल्यानंतर जबाबदार पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देणे आवश्यक असते.

मात्र, घटनास्थळी प्रत्यक्ष न जाता केवळ कागदोपत्री सोपस्कार अधिकार्‍यांकडून केले जात असल्याचे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. त्यामुळे दुचाकी चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोर्‍या करणार्‍या चोरट्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने कोतवाली आणि तोफखाना ही पोलिस ठाणी महत्त्वाची आहेत. मात्र, याच पोलिस ठाण्यात गत काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोर्‍यांचे प्रकार तर नित्याचेच झाले आहे.

तसेच, मंगळसूत्र हिसकावणे, जबरी चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दुचाकी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरीच्या बर्‍याच गुन्ह्यांत घटनास्थळी पोलिस अधिकार्‍यांऐवजी पोलिस कर्मचारीच भेट देतात. त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांच्या अशा बेजबाबदारपणामुळे केवळ क्राईम ग्राफ वाढत असून, चोरटे तसेच मोकाट आहेत.

हा घ्या पुरावा !

मार्कंडेय सोसायटी परिसरात महिलेची पर्स चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (दि.30) घडली. त्यानंतर घटनास्थळी भेट देणार्‍या अधिकार्‍यांमध्ये पोलिस उपअधीक्षक कातकाडे यांचा समावेश आहे. मात्र, कातकाडे हे सोमवार (दि.28) पासून रजेवर असल्याने घटनास्थळी भेट देणार्‍या अधिकार्‍यांमध्ये त्यांच्या नावाची नोंद पोलिस दप्तरी कशी? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

रिझल्ट देणारे अधिकारी सापडेनात

क्षमता नसताना केवळ फिल्डिंग लावून वा राजकीय संबंधाच्या जोरावर क्रीम पोस्टिंग मिळविण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. त्याला कारणेही तशीच असतात. मात्र, आता नवे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून नगरकरांना अपेक्षा वाढल्या असून, पोलिस ठाण्यांचा कार्यभार रिझल्ट देणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवरच सोपविण्याची गरज आहे.

 

Back to top button