नगर : ‘त्या’ पोलिस अंमलदारांना वरिष्ठांकडून सज्जड दम | पुढारी

नगर : ‘त्या’ पोलिस अंमलदारांना वरिष्ठांकडून सज्जड दम

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भिंगार पोलिस ठाण्यातील दोन अंमलदारांमध्ये बुधवारी रात्री फ्रीस्टाईल झाल्याने पोलिस दलात हा विषय चर्चेचा बनला आहे. दरम्यान, हा प्रकार आता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातच एकमेकांना शिवीगाळ करत हातापायी करणार्‍या दोन्ही अंमलदारांना अधिकार्‍यांकडून सज्जड दम देण्यात आला, असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. भिंगार कॅम्प पोलिस ठाणे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. यावेळी मात्र, दोन अंमलदारांनीच आपसात हाणामारी करुन आणखीनच नावलौकिक वाढविला आहे.

अनेक दिवसांपासून मलिदा लाटण्याच्या विषयावरुन या दोघांत धुसफूस सुरु होती, अशी माहिती आहे. याचा स्फोट बुधवारी होऊन पोलिस ठाण्याच्या आवारातच भडका उडाला. त्यानंतर उपस्थित अधिकारी व अंमलदारांनी हा वाद मिटविला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेऊन स्टेशन डायरीमध्ये नोंद केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगितले. तसेच, पोलिस ठाण्यात हाणामारी करेपर्यंत मजल जाण्यामागे मर्जीतील कर्मचार्‍यांना देण्यात आलेली सूट कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. हा विषय पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यापर्यंत गेल्याने, आता ते काय कारवाई करतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Back to top button