नगर-मनमाड महामार्ग प्रकल्प : टक्क्केवारीचा घोळ अन् कोटींची झळ ! | पुढारी

नगर-मनमाड महामार्ग प्रकल्प : टक्क्केवारीचा घोळ अन् कोटींची झळ !

गोरक्षनाथ शेजूळ : 

नगर : नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामांतील तथाकथित टक्क्केवारीच्या या घोळात दोन वर्षांत हा प्रकल्प तब्बल 383 कोटींनी महागला आहे. हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातून काढला जाणार असल्याने याला आता जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. शिर्डी आणि शनिशिंगणापूर देवस्थान दर्शनासाठी तसेच नोकरी कामानिमित्ताने दररोज हजारो प्रवासी नगर-मनमाड महामार्गावरून प्रवास करतात. मात्र, राज्य अख्यत्यारित असताना या मार्गाची बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे या मार्गाचे हस्तांतरण करण्यात आले.

त्यानंतर कोरोना कालावधी असल्याने मार्गाचे काम लांबणीवर पडले. त्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच होता. दररोज छोटे-मोठे अपघात आणि निष्पाप लोकांचे बळी जात होते. त्यामुळे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला.

काम अर्धवट असतानाही बिले काढली !

पूर्वीच्या ठेकेदाराने नगर-मनमाड रोडचे सात टक्के काम केले होते. त्यानंतर त्यांनी हे काम सोडून दिले. मात्र या कामाचे तीन-चार टप्प्यात काही बिले काढण्यात आल्याचे समजते. राष्ट्रीय महामार्ग विभागातील लेखाविभागातून त्या ठेकेदाराची बिले काढल्याबद्दल दुजोरा मिळाला, मात्र किती रकक्कम अदा केली, हे सांगण्यास टाळाटाळ करताना संबंधित कर्मचार्‍यांनी तोंडावर बोट ठेवल्याचे दिसले.

सर्व प्रकाराला जबाबदार कोण?

साधारणतः दोन वर्षांपूर्वी शिंदे कंपनीने नगर-मनमाड महामार्गाचे काम 313 कोटींना घेतले होते. दुर्दैवाने त्यावेळी हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता वाढलेले बांधकाम साहित्याचे दर पाहता नवीन निविदा ही 696 कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे या दोन वर्षांत प्रकल्पाची 383 कोटींनी किंमत वाढली आहे. ही रक्क्कम सर्वसामान्यांकडून कररुपी जाणार आहे. त्यामुळे वेळेतच हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर 383 कोटी वाचले असते. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपिस्थित केला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी 467 कोटींचे अंदाजपत्रक !

सन 2020-21 या आर्थिक वर्षात नगर-मनमाड महामार्गासाठी 467 कोटींचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार केला होता. विळद घाट बायपास ते सावळीविहिर असे 75 कि.मी. अंतराचे काम केले जाणार होते. यात नूतनीकरण व दुरुस्ती, ब्रीज इत्यादी कामांचा समावेश होता. शिंदे नामक ठेकेदार कंपनीने हे काम 27 टक्के बिलो दराने भरले होते. त्यामुळेे हे काम शिंदे यांना 313 कोटींना मिळाले असल्याची माहिती नॅशनल हायवे विभागातून समजली.

रस्ता दुरुस्तीसाठी 8.66 कोटींचा खर्च

ठेकेदार अर्धवट काम सोडून निघून गेल्यानंतर रस्त्यावरील खड्डे तसेच होते. त्यात पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना जिकरीचे आणि तितकेच जीवघेणे बनले होते. या कालावधीत अनेक निष्पाप लोकांना या मार्गाने बळी घेतला. त्यानंतर तातडीने या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 8.66 कोटींची निविदा काढण्यात आली. हे काम जयहिंद कंपनीने घेतले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे मिलिंदकुमार वाबळे यांनी वेगात आणि चांगल्या दर्जाचे काम करण्याबाबत ठेकेदार कंपनीला सूचना केलेल्या आहेत. मात्र यात केवळ दुरुस्ती असल्याने खोदकाम केलेले अर्धवट रस्ते तसेच आहेत.

टक्क्केवारीचा गोंधळ; दिल्लीत चर्चा !

दोन वर्षांपूर्वी ठेकेदाराने काम सुरू केले होते. अनेक भागात खोदकामही केले होते. मात्र काम अर्धवट असतानाच त्या ठेकेदाराने अचानक रहस्यमयरित्या नगरमधून काढता पाय घेतला. त्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठेकेदाराला टक्केवारीचा त्रास दिला जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे नगर-मनमाड महामार्ग आणि टक्केवारी हा विषय राज्यात चर्चेत आला.

नवा आराखडा गेला 798 कोटींपर्यंत !

महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू असले तरी संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता नव्याने 798 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हे काम जीएसटीसह 696 कोटीपर्यंत जाणार आहे. या कामाची निविदा लवकरच काढली जाणार आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत हे काम प्रत्यक्षात सुरू होण्याचा अंदाज आहे.

Back to top button