... आणि बोगस विमान तिकिटे देणार्‍या पप्पूकडून रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर | पुढारी

... आणि बोगस विमान तिकिटे देणार्‍या पप्पूकडून रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा, वाचा सविस्तर

राजेंद्र जाधव : 

कोळपेवाडी : तिरुपती बालाजीला जाणार्‍या विमान प्रवाशांना बनावट विमान तिकीटे देऊन लाखो रूपये खिशात घालण्याचा डाव दैनिक ‘पुढारी’ च्या वृत्तामुळे हाणून पाडला. या ‘पप्पू’ ने सर्व भाविकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.त्यामुळे या भाविकांनी दैनिक ‘पुढारी’चे आभार मानले आहेत. पप्पू घेतलेली लाखो रुपयांची रक्कम परत देण्यास चालढकल करीत होता. आज पैसे मिळतील व उद्या पैसे मिळतील, या भरवशावर फसवणूक झालेले प्रवासी बसले होते. मात्र ‘तारीख पे तारीख’ देवूनही पप्पू दिलेले पैसे देत नव्हता. ज्यांनी या पप्पूला सर्व प्रवाशांच्या तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंट केले होते.

सुरेगाव-कोळपेवाडी येथील प्रीतम गोवर्धन सारडा यांनी दैनिक ‘पुढारी’ शी संपर्क साधून झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली होती. झालेल्या फसवणुकीला दैनिक ‘पुढारी’ ने वाचा फोडून त्याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच या पप्पूने त्या प्रवाशांच्या 4 लाख 50 हजार रक्कमेपैकी 1 लाख 50 हजार रक्कम त्या प्रवाशांच्या खात्यात (दि. 2 डिसेंबर) रोजी जमा केली आहे. उर्वरित 3 लाख रुपये देखील एक आठवड्याच्या आत देणार आहे, अशी माहिती या पप्पूला सर्व प्रवाशांच्या तिकिटासाठी ऑनलाईन पेमेंट करणारे प्रीतम सारडा यांनी दिली आहे.

मागील दोन वर्ष जीवघेणे कोरोना संकट असल्यामुळे बाहेर पडण्यास निर्बंध होते. त्यामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन ऑर्डर करताच सर्व काही दारात अशा सवयी आपल्याला आपोआप लागल्या व मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट करून सर्वच गोष्टींबरोबर विमानाचे तिकीट देखील उपलब्ध होवू प्रत्येक व्यक्ती काहीसा आळशी झाला आहे. ऑनलाईन पेमेंट करताना काही गोष्टींची खातरजमा न करता काळजी घेतली जात नसल्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढले होते. त्यामुळे सायबर क्राईमचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

या फसवणुकीला अशिक्षित व्यक्तींबरोबरच उच्च शिक्षित देखील बळी पडत असून असाच फसवणुकीचा प्रकार कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील प्रीतम सारडा यांच्याबाबत घडला होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व जवळच्या नात्यातील 55 व्यक्तींसाठी शिर्डी व पुणे विमानतळावरून तिरुपती बालाजीला जाण्यासाठी हॉटेल आरक्षणासह ‘स्पाईस जेट’ व ‘इंडिगो’ या विमान सेवा कंपनीचे विमान तिकीट खरेदी करून सबंधित पप्पू नामक व्यक्तीला 5 लाख 89 हजार रुपये दिले होते. मात्र त्यापैकी 18 व्यक्तींनाच खरे तिकिट देण्यात आले. उर्वरित तिकीट मात्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्या तिकिटांचे जवळपास 4 लाख पन्नास हजार रुपये ‘पप्पू’ नामक व्यक्ती अनेकवेळा मागूनही देत नव्हता.

यांतील बहुतेक प्रवाशांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. त्यामुळे न्याय मागायचा तरी कुणाकडे? अशी परिस्थिती या फसवणूक झालेल्या प्रवाशांची झाली होती. त्यांच्या फसवणुकीच्या व्यथेला दैनिक ‘पुढारी’ने वाचा फोडल्यामुळे या प्रवाशांना 1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश खात्यात जमा केला असून उर्वरित पैसे देखील देण्याचे या त्याने मान्य केले आहे. त्यामुळे या प्रवाशांना न्याय मिळणार आहे. त्याबद्दल प्रीतम सारडा त्यांच्या 55 नातेवाईकांनी दैनिक ‘पुढारी’चे आभार मानले आहे.

दैनिक ‘पुढारी’ मुळे रक्कम परत : सारडा

तिरुपती बालाजीला जाण्यासाठी हॉटेल आरक्षणासह 18 प्रवाशांचे तिकीट खरे निघाल्यानंतर 55 प्रवाशांच विमान तिकीट घेतले होते. मात्र ज्या दिवशीचे तिकीट आरक्षित होते. त्या दिवशी विमानतळावर गेलो असता हि विमान तिकिटे बोगस असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. ऐनवेळी ज्यादा पैसे मोजून राहण्याची व्यवस्था करावी लागली. विमान तिकिटासाठी दिलेले पैसे मागील सहा महिन्यांपासून चकरा मारीत होतो. चकरा मारूनही एक छदाम देखील मिळाला नसल्यामुळे पैसे बुडाले, असे समजून सोडून दिले होते. मात्र दैनिक ‘पुढारीने’ आपली जबाबदारी पार पाडून आम्हाला आमचे बुडालेले पैसे परत मिळणार असल्याने आपण ‘पुढारी’ चे धन्यवाद देत असल्याचे प्रीतम सारडा यांनी सांगितले.

Back to top button