कापूस लागवडीसह उत्पादनात उंबरे अग्रेसर! | पुढारी

कापूस लागवडीसह उत्पादनात उंबरे अग्रेसर!

उंबरे : पुढारी वृत्तसेवा :  कापूस लागवडीसह उत्पादनात उंबरे गाव जिल्ह्यात अग्रेसर ठरत आहे. अण्णा ढोकणे, संतोष ढोकणे, दत्तू दुशिंग, गोरक्षनाथ पटारे, अंबादास म्हसे, अल्ताब शेख या तरुणांनी व्यापार्‍यांवर विसंबून न राहता स्वतःकापूस खरेदी केंद्र सुरू केले. यामुळे शेतकर्‍यांना गावातच बाजारपेठ मिळाली. शेतकर्‍यांचा वाहतूक खर्च वाचून दोन पैसे फायदा होत आहे. यातून गावचा अर्थगाडा सुसाट सुटला आहे. नोकर्‍या नाही, हाताला काम नाही, अशी आरडाओरड करण्यापेक्षा स्वतःच्या उद्योग, व्यवसायातून स्वतःसह गावाचा विकास साध्य करणारे उंबरे हे आता आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे.

याच तरुणांच्या यशातून उंबरे गावात अर्थक्रांती वेगात घडत आहे. राहुरी- सोनई राष्ट्रीय महामार्गालगत, मुळेच्या पाट पाण्याच्या उशाला वसलेल्या या बागायत गावात आज छोटे-मोठे उद्योग धंद्यातून झालेला विकास, दुग्ध व्यवसायातून धवलक्रांती, ‘पांढरे सोने’ आगारातून कोटींची उलाढाल, ऊस, कांद्यातून सुजलाम्- सुफलाम् झालेले बागायतदार, यामुळेच उंबरे आज जिल्ह्यासमोर एक आदर्श गाव म्हणून पुढे येताना दिसत आहे.

उंबरे गावाला वै. रघुनाथ महाराजांची परंपरा आहे. येथूनच तालुक्याचे राजकारण चालवले जाते. येथे तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे हे तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामविकासाचा मायक्रो प्लॅन केला आहे. कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे यांनी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून गावात विकास कामे खेचून आणली. साहेबराव दुशिंग, इंजि. नवनाथ ढोकणे, राजेंद्र ढोकणे, इंजि. गोरक्षनाथ दुशिंग, सीताराम ढोकणे, ज्ञानदेव क्षीरसागर, कैलास आडसुरे, अशोक ढोकणे, सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच दारकुंडे, ग्रामसेवक रगड यांचेही गावविकासात योगदान आहे.
राजकारणात दबदबा असलेले उंबरे गाव दुग्ध व्यवसायातही पुढे आहे.

अनेक तरुणांनी दररोज 70- 100 लिटर दूध उत्पादन सुरू केले आहे. मळगंगा दूध संकलन केंद्राचे चेअरमन नाना खंडू ढोकणे, अतूल आडसुरे, सचिन ढोकणे, सीताराम दुशिंग, जनार्धन ढोकणे, राजेंद्र दुशिंग, नवनाथ गवळी यांनी तरूणांना गायी खरेदीसाठी भांडवल देतानाच खर्‍या अर्थाने गावात धवलक्रांती घडवून आणली. यात संतोष ढोकणे, प्रांजल आडसुरे यांनी दूध प्लॅन्ट उभारून शेतकर्‍यांच्या दुधाला जास्त दर देऊ केला. पशुखाद्यात संजय आडसुरे, मेजर ढोकणे यांनी उत्तुंग यश मिळविले. बांधकाम व्यवसायात इंजि. नवनाथ ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग, तुषार ढोकणे, गोरक्षनाथ ढोकणे, सुधीर आण्णा ढोकणे, अमोल गुंजाळ आदी तरुणांनी गावाचे विविध कामांतून देखणे शिल्प उभे केले.

विहिर रिंग कॉन्ट्रक्टर क्षेत्रात शरद ढोकणे, दीपक पंडित, श्रीरंग तांगडे, जगन्नाथ ढोकणे, लक्ष्मण दुशिंग असे एक ना अनेक हिरे गावाने राज्याला दिले. सलून व्यवसायात सचिन शेजूळ, गोपीनाथ गवळी, सोमनाथ गवळी, रामेश्वर गवळी, गणेश शेजूळ, बाबासाहेब हुडे असे कलाकसुरीचे कलाकार येथे आहेत. तालुक्यात शब्दसम्राट म्हणून परिचित आप्पासाहेब ढोकणे यांनी गावाचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचविले. किराणा व्यावसायातून अण्णा दुकानदार, दत्तू ढोकणे, बाळू दुशिंग, सुनील ढोकणे, बाळू भंडारी, बाळू हापसे, दत्तू भवार, जालिंदर ढोकणे मोरे आदींनी यशाचे शिखर गाठले. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. बाळासाहेब ढोकणे, डॉ. लक्ष्मण जोर्वेकर, डॉ. राहुल जोर्वेकर, डॉ. मगर, डॉ. पठारे, डॉ शेळके आदींनी रुग्णसेवेचा वसा जोपासला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातून रुग्ण येत असल्याने गावच्या अर्थचक्राला फायदा होतो. जनावरांच्या दवाखान्यात डॉ. सोनवणे, डॉ. गायकवाड, डॉ. जनार्धन ढोकणे, डॉ. डांगे सेवा देतात. चारा विक्रीतून विजय ढोकणे, भास्करराव ढोकणे आदींनी वेगळा व्यवसाय शोधला.
उत्कृष्ठ मुर्तीकार म्हणून बाबासाहेब व विकास गोरे यांनी स्वतःची छटा उमटवली दिसल्याचे चित्र आहे.

Back to top button