श्रीगोंदा : ‘त्यांनी’बहिष्कार टाकून काय साध्य केले? नगराध्यक्षा शुभांगी पोटेंचा विरोधकांना सवाल | पुढारी

श्रीगोंदा : ‘त्यांनी’बहिष्कार टाकून काय साध्य केले? नगराध्यक्षा शुभांगी पोटेंचा विरोधकांना सवाल

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : सर्वसाधारण सभेत शासनाकडून प्राप्त निधीवर चर्चा, तसेच अन्य विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) आयोजिलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर 20 पैकी 16 नगरसेवकांनी बहिष्कार टाकून काय साध्य केले, असा सवाल नगराध्यक्षा शुभांगी पोटे व नगरसेवक मनोहर पोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात पोटे दाम्पत्यांनी म्हंटले की, चार वर्षे स्वपक्षीय, तसेच विरोधी नगरसेवकांनी काम चांगले असल्यानेच कधी विरोध केला नाही. परंतु, राज्यात सत्तांतर होताच 16 नगरसेवकांनी विरोधात भूमिका घेतली.

ही लढाई नगरपरिषद बाहेर चालू आहे; परंतु नागरिकांच्या व शहर विकास बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली असताना त्याला गैरहजर राहून त्यांना शहर विकास ऐवजी राजकारणात रस जास्त असल्याचे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली आहे. या सभेत प्राप्त निधीवर चर्चा होणे गरजेचे होते; कारण वेळेत निधी खर्च झाला नाही, तर निधी परत जाण्याची भीती असते, म्हणून या सभेला सर्वांनी हजर राहणे गरजेचे होते. परंतु, ते का गैरहजर राहिले? असासवाल करून पोटे म्हणाले, केवळ शहर विकास हेच ध्येय ठेऊन आम्ही 2016पासून काम केले. बदलते शहर हा त्याचा पुरावा आहे. कोविड काळातही विकास निधी मिळवून कामे केली. आमचे नेतृत्व शहराला मान्य आहे. 2016 ते 2018 चा कारभार पाहूनच नागरिकांनी मताधिक्याने आम्हाला पुन्हा निवडून दिले. आमचा कारभार चुकीचा असेल, तर नागरिकांच्या दरबारात फैसला व्हायला हवा; परंतु विरोधक आम्हाला वेगळ्या पद्धतीने पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे.

अजित पवारांनी घेतली माहिती

श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणावर राज्यातील नेत्यांचे लक्ष असून, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. नेत्यांनीही आपाआपल्या पद्धतीने पवारांना माहिती कळविली आहे.

वादाचा शहर विकासावर परिणाम

गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांना पदावरून हटविण्यासाठी 16 नगरसेवकांनी एकत्र येत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, पोटे दाम्पत्यांनी आपल्याला योग्य वागणूक न दिल्याच्या कारणातून ही सगळी घडामोड घडली आहे. या अंतर्गत दुफळीचा शहराच्या विकासावर नक्कीच परिणाम होणार आहे.

Back to top button