जामखेड : बांधकाम पूर्ण करा, अन्यथा होणार रद्द; पंचायत समिती प्रशासनाची धडक कारवाई

जामखेड : बांधकाम पूर्ण करा, अन्यथा होणार रद्द; पंचायत समिती प्रशासनाची धडक कारवाई

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आवास योजना व अन्य राज्य पुरस्कृत आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्यानंतर 90 दिवसात बांधकाम पूर्ण करावे लागते; परंतु जामखेड तालुक्यात एक हजार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामसाठी 15 हजार रुपयेचा पहिला हप्ता घेऊनही बांधकाम सुरू केले नाही. याची गंभीर दखल घेऊन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी ही घरकुले रद्द का करू नये?, अशा आशयाच्या नोटिसा लाभार्थ्यांना पाठविल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

?प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तसेच, महाराष्ट्र शासनच्याही अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना, आदिवासी समुदायासाठी पारधी आवास योजना, धनगर समाजासाठी धनगर आवास योजना, भटक्या विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अशा योजना कार्यरत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेची 'ब' व 'ड' यादी ऑनलाईन असून, क्रमाने लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जातात. बरेच लाभार्थी पहिला हप्ता घेऊन घरकुल बांधकाम सुरू करीत नाहीत.

शासनाकडून लाभार्थ्यांना पहिला हप्ता अग्रीम स्वरुपात 15 हजार रुपये, जोथा पातळी पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता 45 हजार रुपये, खिडकी पातळी पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता 40 हजार रुपये, शौचालयासह घरकुल पूर्ण झाल्यावर चौथा हप्ता 20 हजार रुपये, तसेच शौचालयासाठी प्रोत्साहनपर अनुदान 12 हजार रुपये, मनरेगामधून मजुरीपोटी 24 हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात लाभार्थी अनुदान उचल करून घरकुल विहित मुदतीत पूर्ण करत नाहीत. मागील सहा-सात वर्षांपासून अशी अपूर्ण घरकुले आहेत.

आजवर त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र, शासनाने 16 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढून अमृत महाआवास अभियान सुरू केले. या अभियानात अपूर्ण घरे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले. जर लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर घरकुल अनुदानापोटी मिललेली रक्कम शासन भरून घेणार आहे.

या लाभार्थ्यांचे घरकुल रद्द केले जाणार असून, अनुदान रक्क़म शासनास परत केली नाही, तर सुरुवातीला लोकअदालतमध्ये दावा दाखल करून त्यानंतर आवश्यकता भासल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत घरकुल पूर्ण करावे, ज्यांनी बांधकाम सुरू केले नाही, त्यांनी सात दिवसांत बांधकाम सुरू करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

जामखेड तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी अपूर्ण घरकुले पूर्ण करावी. अन्यथा इतर गरीब, गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. घरकुल पूर्ण करण्याबाबत नोटीस देण्यात येत असून, त्यानंतरही प्रतिसाद भेटला नाही, तर पुढील कारवाई केली जाईल. अशा लाभार्थ्यांचे नाव यादीतून कायमस्वरुपी वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

                                          -प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड

उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कसली कंबर
मागील अभियानात जामखेड तालुक्याला विभागात दुसरा क्रमांक मिळाला होता. यावेळीही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news