श्रीगोंदा : वडाळीतील जबरी चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद | पुढारी

श्रीगोंदा : वडाळीतील जबरी चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वडाळी येथील जबरी चोरी प्रकरणाचा श्रीगोंदा पोलिसांना उलगडा करण्यात यश आले असून, या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आदित्य कांतीलाल काळे (रा.लिंबे, जि. औरंगाबाद) यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 52 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शिवाजी रामभाऊ बागसकर (वडाळी, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली की, 26 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजता चोरट्यांनी घराच्या किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश करुन मलाव पत्नीस बेदम मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा आदित्य कांतिलाल काळे (रा.लिंबे जळगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने दोन साथीदारांसह केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अदित्य काळे याची माहिती काढली असता, तो पिंपळगाव पिसा परिसरात असल्याबाबतची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दि.28 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा गावचे शिवारात कोंबिंग ऑपरेशन राबवत आदित्य काळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही चोरी त्याने लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे व आलुश्या उर्फ दिनेश रमेश काळे (दोन्ही रा. मोहरवाडी ता. श्रीगोंदा) यांनी केली. चोरीसाठी मोटार सायकलचा वापर केला. मात्र,अन्य आरोपी फरार आहेत. आरोपी आदित्य काळे यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीकडून 52 हजार रुपये किमंतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. फरारी दोन आरोपींचापोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आदित्य काळे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Back to top button