वाळकी : मोक्काच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद | पुढारी

वाळकी : मोक्काच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या व न्यायालयाने जामीन रद्द केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शिताफीने पकडले. नगर तालुक्यातील देहरे शिवारात ही कारवाई करण्यात आली. किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय 24, रा.देहरे, ता.नगर), महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे (वय 28, रा.विळद, ता.नगर) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता.

त्यासह त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 नुसार कारवाई करण्यात आलेली होती. न्यायालयाने त्यांना पूर्वी मंजूर केलेला जामीनही रद्द केला होता. मोक्काच्या तपासाच्या अनुषंगाने या फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांचे पथक प्रयत्नशील होते.

एमआयडीसीचे स.पो.नि. युवराज आठरे यांना दोन्ही गुन्हेगार देहरे परिसरात येणार असल्याचे माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पथकासह देहरे परिसरात सापळा लावला व दोन्ही गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई स.पो.नि. युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.ना. साबीर शेख, सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, किशोर जाधव, प्रशांत राठोड, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

Back to top button