नगर तालुका : निंबळक शाळेत आपत्ती व्यवस्थापन; राज्यसरकारकडून लवकरच मॉकड्रिल प्रात्यक्षिक घेणार | पुढारी

नगर तालुका : निंबळक शाळेत आपत्ती व्यवस्थापन; राज्यसरकारकडून लवकरच मॉकड्रिल प्रात्यक्षिक घेणार

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांच्या निर्देशानुसार शाळा सुरक्षा कार्यक्रम संदर्भात शालेय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांतील प्रत्येकी एका आदर्श शाळेमध्ये (मॉडेल स्कूल) आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील नगर तालुक्यातील निंबळक या शाळेची (मॉडेल स्कूल) आपत्ती प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आपत्ती व्यवस्थापन नोडल शिक्षक राजेंद्र निमसे यांनी उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापन कार्याची ओळख करून देताना शाळा स्तरावर निर्माण होणार्‍या आपत्तींचा सामना कसा करता येईल, याबाबत आणि शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्यासंदर्भातील उद्देश स्पष्ट केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.

यावेळी निंबळकच्या सरपंच प्रियांका लामखडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ कोतकर ,शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड , होमगार्डचे पलटण अधिकारी संजय शिवदे, गोकुळ तवले, महापालिका अग्निशमन अधिकारी अशोक कार्ले, बाळासाहेब घाटविसावे, पोलिस नाईक सचिन गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रुपाली मोहकरर, शिक्षक सुखदेव पालवे, शरद जाधव, विशाल कुलट, भागचंद सातपुते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र निमसे, सूत्रसंचालन सुखदेव पालवे तर आभार विशाल कुलट यांनी मानले. दरम्यान, भविष्यात निंबळक शाळा जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरणार आहे.

पदसिद्ध अध्यध्यपदी मुख्याध्यापक
शालेय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी मुख्याध्यापक पोपट धामणे, सचिवपदी विस्तार अधिकारी रामनाथ कराड,उपाध्यक्षपदी नोडल शिक्षक राजेंद्र निमसे व अन्य सर्व विभागाचे अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये नागरी संरक्षण दल, होमगार्ड, अग्निशमन यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग,आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, शालेय व्यवस्थापन समिती यांचा समावेश करण्यात आला आहे.

Back to top button