सव्वा दोन लाख हेक्टरवर रब्बी पेरा ; गहू, हरभर्‍यासह ऊस लागवडीची लगबग | पुढारी

सव्वा दोन लाख हेक्टरवर रब्बी पेरा ; गहू, हरभर्‍यासह ऊस लागवडीची लगबग

नगर :  पुढारी वृत्तसेवा : यंदा पाण्याची पुरेशी उपलब्धतता आणि पोषक वातावरणामुळे रब्बीची पुणे विभागात 52 टक्के पेरणी झाली असून, नगर जिल्ह्यात सव्वा दोन लाख हेक्टरवर 5 टक्के पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून समजली. पुणे विभागात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यात पुणे जिल्ह्यात रब्बीची आतापर्यंत 37 टक्के पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 69 टक्के पेरणी करण्यात आली आहे. तर नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये दोन लाख 20 हजार 546 हेक्टरवर रब्बीची पेरणी केली आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या धरणांत मुबलक पाणी आहे.

ओढे-नालेही वाहीलेले असल्याने भूजलस्त्रोतही वाढलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरी, बोअरवेल्सचा पाणी पुरवठा पुरेशा आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना रब्बीची आणि उन्हाळ्यातही पाण्याची चिंता भेडसावणार नाही, असेच काहीसे चित्र आहे.  शाश्वत पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांनी नोव्हेंबरपासून पेरणीला वेग दिला आहे. कपाशीचे रानं मोकळी करून त्या ठिकाणी गहू, हरभरा पेरला जात आहे. काही भागात मुबलक पाण्यामुळे ऊस लागवडीही सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात रब्बी तृणधान्याखाली 1 लाख 77 हजार 872 हेक्टर क्षेत्र आले आहे. तर रब्बी तृणधान्य, कडधान्य असे मिळून एकूण दोन लाखांहून अधिक हेक्टरवर बळीराजा पिके उभी करताना दिसत आहे. अनेक भागात कपाशीची शेवटची वेचणी सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीच गहू पेरणीला आणखी गती येणार आहे. तसेच थंडी वाढल्यानंतर पेरणी केलेले पिकही डौलात उभे राहणार आहे.

पिक हेक्टर टक्के
गहू ः 32190 37
मका ः 10901 77
हरभराः 42622 48
एकूण ः 220546 48

Back to top button