काष्टी : आमदार पाचपुतेंच्या मुलास विरोध ; इच्छुकांच्या मेळाव्यात सूर | पुढारी

काष्टी : आमदार पाचपुतेंच्या मुलास विरोध ; इच्छुकांच्या मेळाव्यात सूर

काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  गत 60 वर्षांत ‘ओबीसी’ सामाजाला काष्टीचे सरपंचपद मिळालेले नाही. यंदा मात्र ‘ओबीसी’चेच आरक्षण पडले असून, एकाच घरात आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, सोवा सोसायटी, तसेच सरपंचपद दिले तर कार्यकर्त्यांना संधी कोठं?, असा सवाल उपस्थित करत इच्छुकांच्या मेळाव्यात आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांच्या ‘भावी’ला विरोध दर्शविण्यात आला. याच मेळाव्यात आमदार पाचपुते यांचे पुतणे साजन यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

तालुक्यात सर्वात मोठी बाजारापेठ काष्टीची असून, तालुक्याची राजधानी आहे. माझ्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाहेरील व्यक्तींनी जास्त लक्ष देऊ नये, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवणार असल्याचे सांगत आमदार पाचपुते यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.  श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात शुक्रवारी (दि.26) आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

त्यात वार्ड एक ते सहामधील इच्छूक उमेदवारांचे म्हणणे नेत्यांनी जाणून घेतले. जुन्या सदस्या उमेदवारी देऊ नये, ग्रामपंचायतमध्ये अनेक महिला सदस्यांना काही पुरुष सदस्यांनी काम करू दिले नाही, म्हणून गावच्या विकासासाठी सुशिक्षित र्निव्यसनी व होतकरू तरुणांना संधी द्यावी,असा मेळाव्यातील सुर होता. म्हणून नेतेमंडळींनी जनमताचा कौल पाहून उमेदवारी द्यावी, असे विचार अनेकांनी मांडले.
पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या विरोधात असलेले ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते व माजी सभापती अरुणराव पाचपुते यांनी आमदार पाचपुते यांच्या बरोबर येत चांगले काम करण्याचा निर्णय घेतला.

आमदार पाचपुते म्हणाले, काष्टीचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. गावाला दिशा देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून कोट्यावधींचा निधी देवून गावाचा विकास साध्य केला. त्याच मुद्यावर आपण निवडणूक लढवून लढविणार आहे. विरोधकांनी बिनविरोधचाही प्रस्ताव दिला असून, तो मान्य करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जाईल. तसेच, चांगले काम करणार्‍या व्यक्तींना ग्रामपंचायातमध्ये संधी देवू, असे पाचपुते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, माजी सभापती अरूणराव पाचपुते, निवडणूक निरिक्षक बाळासाहेब महाडिक, सुवर्णा पाचपुते, माजी उपसभापती वैभव पाचपुते, ज्ञानदेव पाचपुते, दादासाहेब कोकाटे, डॉ. पांडुरंग दातीर, रफिक इनामदार, राजेंद्र पाचपुते, सुनील पाचपुते यांच्यासह इच्छूक उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
साईसेवा उपाध्यक्ष उत्तम मोरे यांनी प्रास्तविक केले. विक्रमसिंह पाचपुते यांनी आभार मानले.

1927 मध्ये ग्रामपंचायतची स्थापना झाली असून, चार वर्षांनी ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण होतील. 1962 नंतर 60 वर्षांत ‘ओबीसी’ (माळी) समाजाचा सरपंच, उपसरपंच झाला नाही. आता, जनमतातून प्रथमच सरपंचपदासाठी ‘ओबीसी’चे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे नेत्यांनी अधिकृत ‘ओबीसी’ समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी अपेक्षा आहे.
                  -दादासाहेब कोकाटे, संचालक, भैरवनाथ सेवा सोसायटी, काष्टी

साजन यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हा परिषद सदस्य स्व. सदाशिव पाचपुते (अण्णा) यांचा धाकटा मुलगा आमदार पाचपुते यांचा पुतण्या साईकृपा कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते हे बैठकीला गैरहजर होते. गावात स्व. अण्णांची मुले सुदर्शन व साजन आमदार पाचपुतेच्या मुलापेक्षा जास्त जनमतात असतात. त्यामध्ये साजन हे तरुणांच्या गळ्यातील ताईत असून, त्यांची भूमिका काय? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button