नगर : ‘इन्स्टा’चा नाद अन् फसवी विवाहगाठ ! तरुणीची केली फसवणूक

नगर : ‘इन्स्टा’चा नाद अन् फसवी विवाहगाठ ! तरुणीची केली फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरुन दोघांची ओळख होते…गाठीभेटी होतात.. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात होते. तरुणीच्या घरच्यांना आपण 'पीएसआय' असल्याचे सांगून मुलगा तरुणीशी विवाह करतो. अन् काही दिवसांतच पीएसआय असल्याचा बनाव केलेल्या तरुणाचा भांडाफोड होतो. ही आपबिती आहे नगरमधील सावेडी उपनगरात राहणार्‍या व सोशल मीडियाच्या नादात लागून फसव्या विवाह बंधनात अडकलेल्या 22 वर्षीय विवाहित तरुणीची. तिच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण मुरलीधर घुटे (रा.पुणे, मूळ रा. देवळे, ता.जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिक्षणासाठी पुण्यात राहणार्‍या पीडितेची ओळख 2019 मध्ये आरोपी किरण मुरलीधर घुटे याच्याशी इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर एका आयटी कंपनीत काम करणार्‍या किरण व पीडितेच्या भेटीगाठी वाढल्या. नंतर भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. 2019 मध्ये किरणने पीडितेच्या आई-वडीलांना दोघांना लग्न करायचे असल्याचे सांगितले. तसेच, मी पीएसआय होण्यासाठी प्रयत्न करत असून, लवकरच पीएसआय होणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.

त्यानंतर 2 फेब्रुवारी 2021 मध्ये नगरमध्ये पीडितेचा विवाह किरणसोबत लावून दिला. विवाहानंतर दोनच दिवसात किरण पुणे येथे पीएसआयचे ट्रेनिंग असल्याचे सांगून निघून गेला. त्यानंतर दोन महिन्यातून एकदा तो पीडितेला भेटायला नगरमध्ये यायचा व शिवीगाळ, दमदाटी करुन पीडितेचा मानसिक छळ करायचा. तसेच, पैशाचीही मागणी करत होता. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी किरणच्या वडिलांना लग्नाबाबत माहिती दिली असता, आम्हाला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आमचा मुलगा पीएसआय नसून, पुणे येथे खासगी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दक्षता न घेतल्याने मनःस्ताप

सोशल मीडियावर ओळख होऊन अनेक तरुण-तरुणी विवाह बंधनात अडकतात. मात्र, योग्य दक्षता न घेतल्याने त्यातून आयुष्यभराचा मनःस्ताप झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हाच प्रकार सावेडीत राहणार्‍या तरुणीसोबत घडला आहे.

अन् इथंच होतो घात…

मनासारखा जोडीदार मिळावा, ही प्रत्येक तरुण-तरुणीची इच्छा असते. स्वतःच जोडीदाराची निवड करण्याकडे आजच्या पिढीचा कल असतो. यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. सोशल मीडियावर कोणतीही ओळख नसताना समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने असे फसवणुकीचे प्रकार घडतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news