नगर : लहान मुलांना ‘गोवर’चा धोका ! | पुढारी

नगर : लहान मुलांना ‘गोवर’चा धोका !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या महिनाभरापासून राज्यातील काही भागांत लहान मुलांवर गोवरचे संकट कोसळले आहे. गोवर संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालात जगातील 4 कोटी बालकांना गोवरचा हा धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातूनही बालकांचे लसीकरण, पालकांमध्ये जनजागृती आणि शाळानिहाय सर्वेक्षण, अशी मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनानंतर आणखी एका महासाथीच्या रोगाचे संकट जिल्ह्यावर घोंगावत असताना बालकांच्या लसीकरणाला आणखी वेग द्यावा लागणार आहे.

सन 2021 मध्ये कोरोनाने थैमान घातले असताना आरोग्य यंत्रणा या विषाणूविरोधात लढताना दिसली. मात्र, याच कालावधीत गोवरसह अन्य लसीकरणाची गती प्रचंड मंदावल्याचेही दिसले. याचा परिणाम म्हणून आता गोवर पुन्हा डोके वर काढत आहे. एक किंवा दोन डोस चुकलेल्या मुलांना गोवरचा धोका संभावतो, असे आरोग्य विभागाचे मत आहे. सध्या मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये गोवरचे रुग्ण आढळत आहे. नगर जिल्हा मात्र तूर्ततरी सुरक्षित असल्याचे दिसते. असे असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. संदीप सांगळे यांनी जिल्हा आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना लसीकरण, औषधोपचार इत्यादी महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत.

डोस कधी घ्यायला हवे !

जन्मानंतर नऊ महिन्यांनी पहिला डोस
जन्मानंतर 19 महिन्यानंतर दुसरा डोस

ग्रामीण लसीकरणाची स्थिती !

उद्दिष्ट्ये ः 68 हजार 322
पहिला डोसः 41 हजार 417

उद्दिष्ट्ये ः 66 हजार 755
दुसरा डोस ः 40 हजार 363
गोवरची ही आहेत लक्षणे ?
ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, अशक्तपणा, घशात खवखव करणे, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढर्‍या रंगाचे चट्टे दिसणे इत्यादी.

वैद्यकीय अधिकार्‍यांना बैठकीत सूचना !

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी काल शुक्रवारी 14 तालुका आरोग्य अधिकारी, 96 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्याचे समजले. यामध्ये गोवरचे लसीकरण ज्या बालकांचे राहिले आहेत, त्यांचा शोध घ्या, त्यांचे लसीकरण पूर्ण करून अहवाल सादर करा. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची तत्काळ माहिती कळवा, संबंधितांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्याचे आवाहन डॉ. सांगळे यांनी केले आहे.

खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेणार !

जिल्ह्यात साधरणतः एक हजारांच्या पुढे डॉक्टर आहेत. सध्याच्या गोवर संकटात या बालरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने तसेच गावातील डॉक्टरांच्या सहकार्यातून काही वैद्यकीय उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी कालच्या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी गोवरसंदर्भात खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या एकही गोवरचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, तरीही आपली आरोग्य यंत्रणा अलर्ट केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांना आज बैठक घेवून महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. लवकरच खासगी डॉक्टरांचीही कार्यशाळा घेतली जाणार आहे. कुठेही संशयित रुग्ण आढळलाच तर तत्काळ आमच्याकडे रिपोर्टिंग करण्याबाबतही कळविले आहे.
                                             -डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Back to top button