नगर : वाढदिवसाचा फ्लेक्स लावताय ? दाखल होईल फौजदारी गुन्हा | पुढारी

नगर : वाढदिवसाचा फ्लेक्स लावताय ? दाखल होईल फौजदारी गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दादा, भाऊंचा वाढदिवस आता सार्वजनिक जागेत साजरा करता येणार नाही. सार्वजनिक जागेत वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावल्यास अतिक्रमण विरोधी पथक व पोलिस प्रशासन थेट कारवाई करीत फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. तसा इशाराच महापालिका आयुक्तांनी दिला आहे. महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत. त्यातून महापालिकेचा मोठ्या प्रमाणात कर बुडत असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे आयुक्त पंकज जावळे यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील चौका-चौकात वाढदिवस, श्रद्धांजलीचे फ्लेक्स बोर्ड लावले जातात. काही ठिकाणी फ्लेक्स बोर्डमुळे चौकातील सिग्नल झाकून जातात. तर, दुसरीकडे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तशा नागरिकांच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्याचा आयुक्तांनी अहवालही मागविला होता.

त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाला तत्काळ सूचना देत अनधिकृत फ्लेक्स बोर्ड हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने फ्लेक्सधारकांना आठ दिवसांत फ्लेक्स बोर्ड काढून न घेतल्यास थेट कारवाई करण्याच्या इशारा दिला आहे. अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिस संयुक्त कारवाई करणार आहे. संबंधितांकडून दंड आकारणी केली जाणार आहे तर, त्यांच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा मनपा अधिकार्‍यांनी दिला.

Back to top button