मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त जाहीर | पुढारी

मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त जाहीर

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या नूतन विश्वस्त मंडळाची निवड गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वेंयार्लगड्डा यांनी जाहीर केली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार असून, मोहटा गावातील पाच, तर अन्य गावांतील भाविकांमधून पाच असे एकूण दहा विश्वस्तांच्या निवडीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टमधील दहा विश्वस्तांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी आहे.  देवस्थानचे नूतन विश्वस्त मंडळ सन 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त असणार आहे.

मोहटे गावातील शशिकांत रामनाथ दहिफळे, बाळासाहेब किसन दहिफळे, प्रतिभा नितीन दहिफळे, विठ्ठल आजीनाथ कुटे, अक्षय राजेंद्र गोसावी, तर मोहटे गावाव्यतिरिक्त भाविकांमधून,श्रीराम गंगाधर परतानी (पुणे), अ‍ॅड कल्याण दगडू बडे (औरंगाबाद), डॉ श्रीधर मधुकर देशमुख (पाथर्डी), अनुराधा विनायक केदार (पाथर्डी), अ‍ॅड विक्रम लक्ष्मण वाडेकर (नगर) अशा दहा विश्वस्तांनी निवड झालेल्याची नावे आहेत. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवस्थान राज्यात प्रसिद्ध असून, या देवीच्या ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळातील 10 विश्वस्त पदांकरिता 276 व्यक्तींनी अर्ज प्राप्त झाले होते. मोहटे गावातील 5 विश्वस्त पदाकरिता 89 तर मोहटे गावाव्यतिरिक्त भाविकांतून 187 अर्ज इच्छुकांनी भरले होते. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ काल, (दि.24) संपुष्टात येऊन नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आहे.

जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मध्ये एकूण 15 विश्वस्त असून ,त्यापैकी पाच हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. त्यामध्ये जिल्ह्या न्यायाधीश, उपवनसंरक्षक अधिकारी, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे, तर दहा विश्वस्त मंडळांची नेमणूक दर तीन वर्षांतून एकदा करण्यात येते. दहा विश्वस्तांमध्ये मोहटे गावातील पाच व देवी भक्तातून पाच विश्वस्तांची निवड केली जाते. या ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एक हे असतात. साडेतीन शक्तीपीठापैकी श्री क्षेत्र माहूरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे.चौसष्ट योगिनी अष्ट भैरव दश महाविद्याची मूर्ती श्री यंत्राकार दर्शन रांगेत स्थापित असून असे स्थान राज्यात एकमेव आहे.

मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश- एक- सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा पदसिद्ध विश्वस्त अश्विनी बिराजदार,उपवनसंरक्षक नगर सुवर्णा माने, पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी अभिनंदन केले, अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

नूतन विश्वस्तांकडून भाविकांच्या अपेक्षा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक राज्याच्या विविध भागातून देवीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असतात. मोहटा देवीचे मंदिर अतिशय सुरेख बांधण्यात आले असून, येणार्‍या काळात या नूतन विश्वस्त मंडळाकडून देवीच्या भक्तांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देवीचे महात्म्य वाढीसाठी चांगले प्रयत्न होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button