महिलांसाठी भरोसा सेल उभारा : गोर्‍हे

महिलांसाठी भरोसा सेल उभारा : गोर्‍हे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पीडित महिला व मुलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला व मुलांच्या मदतीसाठी पोलिस उप अधीक्षक स्तरावर भरोसा सेल उभारण्यात यावेत.तसेच विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी जिल्हयातील प्रत्येक महाविद्यालयात सेफ कॅम्पस सुरू करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विषयांचा आढावा उपसभापती गोर्‍हे यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडून घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीस महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, माजी महापौर भगवान फुलसुंदर, सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपसभापती डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलांनाही या भरोसा सेलपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक पोलीस उप विभागीय अधिकारी स्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात येऊन या सेलच्या माध्यमातून पिडित महिला व बालकांना आधार देण्याचे काम करण्याच्या सुचनाही डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी केल्या.

कोव्हीडमुळे ज्यांना पती गमवावा लागला अशा एकल महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करा असे निर्देश देत डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, अशा महिलांच्या पतीच्या नावे शेती किंवा व्यवसाय असेल तर पतीच्या जागी वारस म्हणून त्यांचे नाव नोंदविण्यात यावे.
या महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.

उच्चशिक्षित असणार्‍या काही महिलाही यात एकल महिला झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न प्रशासनाने करावेत. महिलांसाठी शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनांची माहिती महिलांना मिळावी यासाठी समाधान शिबीरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news