पारनेर :  रात्रीतून चार ठिकाणी चोर्‍या, पोलिसात गुन्हा दाखल | पुढारी

पारनेर :  रात्रीतून चार ठिकाणी चोर्‍या, पोलिसात गुन्हा दाखल

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा : शहरात चोर्‍याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. शहरातील चेडे मळ्यात चोरट्यांनी चार ठिकाणी चोर्‍या करीत 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील चेडे मळा येथील अशा भाऊसाहेब चेडे यांची सोन्याच्या 2 नथ चोरट्यांनी चोरून नेली. तसेच कपाटाची उचकापाचक केली. त्यानंतर राजू बाळासाहेब चेडे यांच्या घरासमोरून मोटरसायकल (क्रमांक एच 12 जी.एम. 2444) चोरून नेली. तसेच रामदास भिमाजी चेडे यांच्या दुकानामागे लावलेला टेम्पोचा दरवाजा वाकवून उचकापाचक केली.

त्यात काही मिळून आले नाही. त्यानंतर गणेश बन्सी चेडे यांचा मोबाईल घरासमोर पत्र्याच्या पडवीत ठेवला होता. तो चोरट्यांनी नेला, असा एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत आशा भाऊसाहेब चेडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून पारनेर पोिीस निरीक्षक घनश्याम बळप तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरातील नागेश्वर मंदिरात अडीच लाख रुपयांचा चांदीची चोरी होऊन काही दिवस झाले. अद्यापि त्याचाही तपास लागला नाही, तसेच काही दिवसापूर्वी शहराजवळील कन्हेर ओहोळ येथे घरफोड्या झाल्या होत्या. सातत्याने पारनेर शहरात चोर्‍या होत आहेत. पोलिस मात्र चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरत आहेत. पोलिसांचा दबाव चोरट्यांवर राहिला नाही का? असा सवाल नागरिकांनी केला.

……..रात्रीची पोलिस गस्त वाढवा!

तालुक्यात अनेक दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांचा धाक गुन्हेगारी प्रवृत्तीवर राहिला नाही. गुन्हेगार राजरोसपणे पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरील नागेश्वर मंदिरात लाखोंची लूट करतात, याला चार दिवस उलटत नाहीत, तोच चेडे मळ्यात चोरट्यांनी चार घरांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने असे प्रकार होत असतील, तर प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button