राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत : पशुसंवर्धनमंत्री विखे पा. यांची माहिती | पुढारी

राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत : पशुसंवर्धनमंत्री विखे पा. यांची माहिती

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी व कुक्कुट व्यवसाय करणार्‍या कंपन्यांच्या व्यवसायातील अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणार्‍या या समितीत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, कंत्राटी मांसल कुक्कूट व्यवसाय करणारे तीन शेतकरी, ओपन पद्धतीने मांस कुक्कूट व्यवसाय करणारे शेतकरी, कुक्कूट अंडी उत्पादन करणारे पाच शेतकरी, कुक्कूट व्यवसायीक कंपन्यांचे पाच प्रतिनिधी, राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे प्रतिनिधी तर पशुसंवर्धन उपआयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

राज्यात कुक्कुटपालन करणारे शेतकरी व कंपन्यांना येणार्‍या अडचणी समजून घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे 3 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या विविध भागातून करार पद्धतीने मांसल कुक्कूट पालन, अंडी उत्पादक शेतकरी व व्यवसायीक कंपन्यांचे प्रतिनिधींच्या अडचणीवर लक्ष वेधण्यात आले. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागाला प्रतिनिधीत्व देवून शेतकरी व कंपन्यांच्या प्रतिनिधीचा समावेश असलेली राज्यस्तरीय कुक्कूट समन्वय समितीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्यात प्रथमच अशा पद्धतीची समिती स्थापन झाल्याचे सांगत, मंत्री विखे पा. म्हणाले, या समितीची तीन महिन्याला नियमित बैठक होवून, तिचे इतिवृत्त शासनास सादर होईल. यातून कुक्कुट पालन करणारे शेतकरी, कंपन्यांना येणार्‍या अडचणींवर चर्चा होईल. महत्वाचे असे की, खासगी कुक्कुटपालन करणारे शेतकरी करार पद्धतीने कुक्कुट पालक कंपन्यांसोबत व्यवसाय करतात, परंतू मुळ दर करार, ग्रोईंग चार्ज, लिफ्टींग चार्ज, मजूरी परतावा न देणे याबाबत तक्रारींचे निराकरण ही समिती करल, अस मंत्री विखे पा. यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

समस्यांवर चर्चेतून करणार उपाययोजना..!

आवश्यक शिफारशी करणे, कुक्कुट व्यवसायात उद्भवणार्‍या प्रासंगिक समस्यांवर चर्चा करुन उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती काम करणार असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

Back to top button