नेवासा : संजीवन समाधीनिमित्त कार्यक्रम, दीपोत्सवाने उजळले मंदिर | पुढारी

नेवासा : संजीवन समाधीनिमित्त कार्यक्रम, दीपोत्सवाने उजळले मंदिर

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये मंगळवारी (दि.22) सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघाले होते. यावेळी ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने परिसर दूमदुमला होता. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या दीपोत्सवाप्रसंगी पैस खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले.

त्यानंतर वारकर्‍यांच्या हस्ते पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात येऊन संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन करण्यात आले. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संध्याकाळी श्रीधर फडके यांचे ओंकार स्वरूप गायलेली भक्ती गीते यावेळी झाली. तसेच, नेवाशातील समर्पण फाऊंडेशनच्या वतीने डॉ. दिलीप पडघन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रमुख विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ दिलीप पडघन, समर्पणचे डॉ.करणसिंह घुले, मंदिर विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, भैय्या कावरे, भगवान सोनवणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजने गाऊन व माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button