नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली! | पुढारी

नगर : ‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यापूर्वी बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून लक्ष लागलेली संवर्ग एक आणि संवर्ग दोन ही यादी देखील नुकतीच पोर्टलवर दिसू लागली आहे. या यादीनुसार 1471 शिक्षकांना दुर्धर आजार, दिव्यांग, 53 वर्षे पूर्ण इत्यादी आधारे बदलीत प्राधान्य हवे आहे, तर 218 पती-पत्नींनीही संवर्ग दोन मधून एकत्रिकरणाची मागणी केली आहे. शिक्षक बदल्यांची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या सुरू झाल्या. प्रारंभी बदलीपात्र अर्थात सध्याच्या शाळेत पाच वर्षे सेवा करणारे 1471 शिक्षक हे संवर्ग चारमध्ये समाविष्ट आहेत.

अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा देणारे 794 शिक्षक हे संवर्ग तीनमध्ये बदलीसाठी प्राधान्यक्रमावर आहेत. तर संवर्ग एकसाठी 1479 शिक्षकांनी आपली माहिती बदली पोर्टलवर भरली आहे. तर संवर्ग दोनमधील प्राधान्यासाठी 218 पती-पत्नींची माहिती अपलोड आहे. या यादीतून पात्र अपात्र अर्ज काढले जाणार आहेत. यावर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील, त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर सीईओंकडेही अपील करता येतील. त्यावर सुनावणीनंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर बदलीस पात्र शिक्षक पुढे येतील.

गुरुजींची माहिती खरी की खोटी; पडताळणी करा!

शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे ऑनलाईन बदली प्राधान्यासाठी अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणार्‍या खर्‍या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत अवर सचिव उर्मिला जोशी यांनी सीईओंना सूचना केल्या आहेत.

‘त्या’1689 गुरुजींना हवी सोयीची बदली!

संवर्ग 1 मध्ये 1479, तर संवर्ग 2 मधून 218 अर्ज; यादी झाली प्रसिद्ध त्रिसदस्यीय समिती ठरविणार ‘पात्र की अपात्र’!
संवर्ग भाग 1 मध्ये प्राधान्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेणार आहे. दि. 23 रोजी दुपारी 1.00 वा. पर्यंत हार्ड कॉपीसह या कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केल्या आहेत.

‘त्या’ शिक्षकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई!
पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Back to top button