संगमनेर : फ्लेक्समुळे संगमनेरात विद्रुपीकरणाचे चित्र! | पुढारी

संगमनेर : फ्लेक्समुळे संगमनेरात विद्रुपीकरणाचे चित्र!

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरासह नवीन नगर रोडवर व स्वतःला युवा नेते समजणारे काहीजण नगरपालिकेची कुठल्याही प्रकारचे परवानगी न घेता मोठ-मोठे फ्लेक्स लावत आहेत. या फ्लेक्समुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बस स्थानकाचे अक्षरशः विद्रूपीकरण होत आहे, मात्र याकडे नगरपालिकेसह बसस्थानक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बस स्थानक परिसरात भाजप शिंदे सरकार तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचेसुद्धा फोटो टाकून फ्लेक्स लावल्याने तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नवीन नगर रोड बस स्थानक व अकोले नाका परिसरात वाहन वळण्याच्या ठिकाणी अनेक युवा नेते आपल्या वाढदिवसाचे मोठ-मोठे शुभेच्छा फलक लावतात. या फ्ले क्समुळे बस स्थानकातून बाहेर पडणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसलासुद्धा समोरील येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे . काहीजण फ्लेक्स लावण्याबाबत नगरपालिकेकडून परवानगी घेतात तर काहीजण परवानगी घेत नाहीत.

यात काहींचे राजकीय हित संबंध असल्यामुळे नगरपालिका प्रशासनसुद्धा कारवाई करण्यास पुढाकार घेत नाही. त्यामुळे स्वतःला युवा नेते समजणार्‍यांचे चांगलेच फावत आहे. संगमनेर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तैलचित्र तयार केले आहे. त्याच्यापुढे छोटेखाणी ‘कॉर्नर उद्यान’ उभारले आहे. त्याच्या समोरच हा फ्लेक्स लावल्याने म. गांधीजींची प्रतिमा व उद्यान दोन्ही गोष्टी झाकल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकेने हे उद्यान व चित्र उभारून लाखो रुपये वाया घातले की काय, असाही सवाल आता नागरिक करीत आहेत.

संगमनेरातील प्रस्थानक परिसरात मोठ-मोठे फ्लेक्स लावून आपल्याच कार्यकर्त्यांनी बस स्थानकाचे विद्रूपीकरण केल्याची बाब काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, आ. बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात येताच, त्यांनी आपल्या चालकास गाडी बस स्थानक आवारात घेण्यास सांगितले. पालिका अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी स्वतःचा फोटो लावलेला मोठा फ्लेक्स काढण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर यापुढे या भागामध्ये कोणाचाही फ्लेक्स लागणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, याबाबत सक्त सूचना उपस्थित अधिकार्‍यांना केल्या होत्या. आ. थोरात यांच्या सक्त आदेशा नंतर साधारणतः वर्षभर बस स्थानक परिसरात एकही फ्लेक्स न लावता संपूर्ण परिसर फ्लेक्समुक्त झाला होता.

आता पुन्हा वर्षानंतर बस स्थानक परिसरात जेथे-थे परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणाची निवड झाली, कोणाचा वाढ दिवस आला, कुणाच्या दुकानाचे उद्घाटन असलं की, या ठिकाणी हमखास फ्लेक्स लावले जातात. पुन्हा एकदा बसस्थानक आवारात फ्लेक्स लागत असल्याने या परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.

संदेश नेमका काय? अनेकांना पडला प्रश्न..!
संगमनेर शहरात नवीन नगर रोडवरील इंदिरा गांधी तैलचित्राजवळ भाजप आणि शिंदे गट व उद्धव ठाकरे गटासह काँग्रेसचे एकूण 25 फोटो असलेला फ्लेक्स एका ज्येष्ठ नागरिकाने लावला आहे. या फ्लेक्सवर ‘राम- राम गेलं आणि जय श्रीराम आलं!’ असा मथळा लिहिण्यात आला आहे. त्याखाली ‘उद्धवा अजब तुझे सरकार, एकनाथा अजब तुझा चमत्कार, हा माझा शेवटच्या क्षणापर्यंत नमस्कार, भारत माता की जय, वंदे मातरम् व मातृभूमी तुझे सलाम’ आणि शेवटी ज्येष्ठ नागरिकाच्या हातात तिरंगा ध्वज घेतलेला फोटो असलेला फ्लेक्स संगमनेर शहरात चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. नेमकं त्या ज्येष्ठ नागरिकाला या फ्लेक्समधून काय म्हणायचं आहे? याचा उलगडा अनेकांना झालेला दिसत नाही.

Back to top button