राहुरी; पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी सुरू केलेली दुरूस्ती तुटपुंजी ठरत आहे. राहुरी फॅक्टरी हद्दीत एकेरी वाहतुकीने रस्त्यावर सतत ट्रॉफिक जामची समस्या वाढत आहे. अपघाताच्या संख्या कमी होत नसून, सुतगिरणी हद्दीत एकेरी वाहतूक सुरू असताना कंटेनरने दुचाकीवरील मायलेकास जोराची धडक दिली. या अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नगर- मनमाड रस्त्यावर राहुरी फॅक्टरी हद्दीतील सुतगिरणी परिसरात एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील सोमनाथ विलास चौधरी (30) हे आई लता विलास चौधरी (49) यांच्यासह दुचाकी (क्र. एम एच 17 एजे 8733) वरुन (निमगाव, ता. नगर) येथे वर्षश्राद्धासाठी जात होते. यावेळी समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीवरील माय- लेकाला अक्षरशःचिरडले. यामध्ये लता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास चौधरी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले.
लगतच्या प्रवाशी व नागरीकांनी धाव घेत विलास यास तत्काळ नगर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या दुर्घटनेनंतर नगर- मनमाड रस्त्यावर वाहतूक दुतर्फा खोळंबली होती. नगर- मनमाड रस्त्याची डागडूगी केली जात आहे, परंतु आभाळ फाटल्याप्रमाणे थिगळे लावूनही रस्त्याची अवस्था सुधारत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. नगर- मनमाड रस्त्याचे काम सुरू करणे, हाच एकमेव पर्याय आहे. रस्त्याच्या कामाला तातडीने प्रारंभ करावा, अशी अपेक्षा सर्वांना लागली आहे. अपघाताच्या या दुर्घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राहुल चौधरी यांच्या तक्रारीनंतर अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.