कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील देवगावसह परिसरात आठ दिवसांपासून रोज रात्री वीज गायब होत आहे. यामुळे ग्राहकांना रात्री रोजच अंधाराचा सामना करावा लागतो. त्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. देवगाव येथे वीज वितरण कंपनीचे 33 केव्ही सबस्टेशन असून, येथे वितरण कंपनीचे कक्ष कार्यालय आहे. या कार्यालयात एक सहाय्यक अभियंता, लाईनमन, वायरमन, अशा कर्मचार्यांची नेमणूक आहे.
परंतु या नेमणुकीतील एकही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालयी राहत नसून, दररोज आपल्या गावाहून ये-जा करतात. रात्री-अपरात्री होणार्या बिघाडाकडे लक्ष देण्यासाठी कुठलाही कर्मचारी उपलब्ध नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून रोज रात्री वीज गायब होते. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येते. त्यातच परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने शेतकर्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रात्रीच्या वेळी एकही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने बिघाड झालेली वीज दुरुस्त कोण करणार?, याची तक्रार कोण करणार? आणि जर कोणी तक्रार कलीच, तर त्या शेतकर्यांकडे कृषी पंपाच्या थकीत आसलेल्या रकमेचा तगादा लावण्याचे अधिकार्यांकडून सांगितले जाते. म्हणून तक्रार करण्याचे सहसा धाडस कोणी करत नाही; परंतु तरीही अधिकारी आणि कर्मचार्यांच्या मनमानी कारभारा विरोधात मोठी चीड नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
किरकोळ कामांसाठी पैशाची मागणी
देवगाव येथे घरगुती किंवा व्यवसायासाठी वापरल्या जाणार्या वीज कनेक्शनमध्ये काही बिघाड झाल्यास, बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्याचबरोबर कृषी पंपाच्या ट्रांसफार्मरमध्ये काही बिघाड असल्यास तो दुरुस्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांकडून पैशाची मागणी केली जाते.
घोडेगाव उपविभागाच्या अधिकार्यांकडून वसुली
घोडेगाव उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून परिसरात असलेल्या घरगुती, व्यावसायिकांचे एक महिन्याचे वीज बिल थकल्यास तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात येऊन वीज ग्राहकांकडून वसुली करण्यात येते. त्याच पद्धतीने सेवा का पुरवली जात नाही असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जातो. त्याचबरोबर परिसरात असलेले लाखो रुपयांचे अनेक लोखंडी पोल, विजतारा अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगणमाताने गायब झाल्या आहेत. याच्या तक्रारही वरिष्ठांकडे करण्यात आल्या; परंतु काही उपयोग झाला नाही.म्हणून लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत वीज ग्राहक आहेत.