

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतून घेतलेले काम पूर्ण करूनही अनामत रक्कम मिळत नसल्याने संतप्त ठेकेदार आणि बांधकामच्या कर्मचार्यामध्ये सोमवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी काही कर्मचार्यांनी ठेकेदाराला शांत केल्यामुळे प्रकरण शमल्याचे दिसले. सोमवारी (दि..21) दुपारी एक ठेकेदार संतापाच्या भरात बांधकाम विभागात आला होता.
त्याने 'त्या' कर्मचार्याचा टेबल गाठून अजून किती वेळा यायचे, काही अडचण असेल तर स्पष्ट सांगा, होणार नसेल तर तसेही सांगा, असे म्हणून आपल्या प्रलंबित बिलाबाबत जाब विचारला. बोलता बोलता हा विषय अरेरावीवर गेला. ठेकेदार आणि कर्मचारीही आक्रमक झाल्याचे दिसले. प्रकरण पुढे जाण्यापुर्वीच काही कर्मचार्यांनी दोघांचीही समजूत काढून प्रकरणावर पडदा टाकला.
दरम्यान, यावेळी अन्य उपस्थित ठेकेदारांनी आमची बिले असतील किंवा अन्य आर्थिक फाईल असेल, यात जर काही अडचण असेल, तर कर्मचार्यांनी ते स्पष्टपणे सांगावे. मात्र कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यानेच अशा घटना घडतात, असा आरोप केला.
दरम्यान, यापूर्वीही कामांची बिले काढण्यावरून ठेकेदार आणि कर्मचार्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
यावर ठेकेदारांसाठी जिल्हा परिषद प्रवेशव्दारावरच स्वतंत्र कक्ष उभारून त्याच ठिकाणी बिले जमा करणे, तसेच शंकाचे निराकरण करण्याची व्यवस्था केली होती. मात्र आता हा कक्षच बंद झाल्याने असे प्रकार भविष्यातही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.