नगर : जिल्ह्यात 56 टक्के मतदान कार्ड आधार लिंक

नगर : जिल्ह्यात 56 टक्के मतदान कार्ड आधार लिंक
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 19 लाख 97 हजार 263 मतदारांनी आपले आधारकार्ड मतदान ओळखपत्रांशी जोडले आहे. त्यामुळे एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात 56 टक्के मतदारांनी आधार जोडणी केली. यामध्ये नेवासा मतदारसंघाने आघाडी घेतली असून, या मतदारसंघात 79 टक्के तर शेवगाव मतदारसंघात सर्वात कमी फक्त 37 टक्के जोडणी झालेली आहे. मतदार यादी बिनचूक करण्यासाठी तसेच दुबार मतदार शोधून काढण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आधारकार्ड मतदार ओळखपत्रांशी जोडण्याचा निर्णय घेतला.

या जोडणीमुळे बोगस मतदानला आळा बसणार आहे. आधार जोडणी मोहीम 1 ऑगस्टपासून सुरु झाली. या साडेतीन महिन्यांत 19 लाख 97 हजार 263 मतदारांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. ही मोहिम ऐच्छिक असली तरी ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नेवासा मतदारसंघात सर्वाधिक जोडणी झाली.

या मतदारसंघातील 2 लाख 14 हजार 769 जणांनी मतदान कार्डाशी आधार लिंक केले आहे. संगमनेर मतदारसंघातील 2 लाख 6 हजार 137 मतदारांनी आधार लिंक केले. शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात मात्र, सर्वात कमी 1 लाख 32 हजार 87 मतदारांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे.शहरी भाग असलेल्या अहमदनगर मतदारसंघात कमी प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 41 टक्के मतदारांनी आधार जोडणी केली आहे.

1 एप्रिल 2023 पर्यंत जास्तीत जास्त मतदान कार्डांना आधार लिंक करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने धावपळ सुरु आहे. ज्या मतदारांनी आधार लिंक केले नाही, अशा मतदारांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

आधार जोडणी

अकोले 154447, संगमनेर 206137, शिर्डी 146982, कोपरगाव 144014, श्रीरामपूर 172036, नेवासा 214769, शेवगाव 132087, राहुरी 45215, पारनेर 191919, नगर 120053, श्रीगोंदा 191215, कर्जत-जामखेड 178389.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news